

पणजी: करमळी येथील प्रस्तावित मेगा प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आक्रमक चेहरा आणि स्थानिक पंचसदस्य अॅड. भुवनेश्वर फातर्पेकर एका भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी पणजी-जुने गोवे महामार्गावर हा अपघात घडला. दरम्यान, या घटनेनंतर तर्कवितर्कांना उधाण आले असून, फातर्पेकर यांच्या कुटुंबाने हा केवळ अपघात नसून घातपाताचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. फातर्पेकर आपल्या दुचाकीवरून पणजीच्या दिशेने येत होते. यावेळी मागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की फातर्पेकर रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर कारचालक पसार झाला आहे. जखमी फातर्पेकर यांना उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
अॅड. भुवनेश्वर फातर्पेकर हे करमळी येथील प्रस्तावित मेगा प्रकल्पाचे कट्टर विरोधक होते. ५ जानेवारीला झालेल्या आंदोलनात त्यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्यासोबत आघाडीवर राहून नेतृत्व केले होते. तसेच ग्रामसभेतही त्यांनी या प्रकल्पाच्या कायदेशीर आणि पर्यावरणीय बाजू मांडत प्रशासनाला धारेवर धरले होते.
जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून फरार वाहनाचा शोध घेतला जात आहे. आंदोलनातील एका प्रमुख व्यक्तीचा अशा प्रकारे अपघात झाल्याने स्थानिक जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे.
भुवनेश्वर यांचे वडील चंद्रकांत फातर्पेकर यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, हा अपघात नसून माझ्या मुलाला संपवण्याचा कट आहे. भुवनेश्वर मेगा प्रकल्पाविरोधात सक्रिय असल्याने त्याला लक्ष्य करण्यात आले आहे. पणजी-जुने गोवे हा तीन पदरी विस्तीर्ण महामार्ग असताना, दुचाकीच्या सुरक्षित लेनमधून जाणाऱ्या माझ्या मुलाला कारने धडक कशी दिली? यामागे एका आमदाराचा आणि काही राजकारण्यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.