

पणजी: करमळी ग्रामपंचायतीने सर्वे नं. २८९/० या जागेवर बेकायदेशीरपणे कचरा व मिश्र कचरा टाकल्याप्रकरणी प्रसाद सुरेश परुळेकर यांना अंतिम निर्देश नोटीस बजावली आहे. तत्काळ कचरा टाकणे बंद करावे, तसेच ७ दिवसांच्या आत सर्व कचरा हटवून जागा पूर्वस्थितीत आणावी असे बजावले आहे. शिवाय त्यांना या प्रकरणात एक लाख रुपयांचा दंडही पंचायतीने ठोठावला आहे.
पंचायतीने ठोठावलेला दंडाची रक्कमही निश्चित कालावधीत भरावी लागणार आहे. अन्यथा कायदेशीर वसुली प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे परुळेकर यांना बजावले आहे. पंचायतीने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देताना परुळेकर यांनी सादर केलेले उत्तर हे स्थळ पाहणी अहवालांचा, स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींचा आणि पंचायतीच्या चर्चेचा आढावा घेतल्यानंतर हे अपुरे व कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, कारवाईचे पालन न झाल्यास गोवा स्टेट वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने कचरा हटवण्यात येईल व त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, तसेच पूर्वी लागू असलेले निर्बंध व ठराव कायम राहतील, असे पंचायतीने म्हटले आहे.
पंचायतीच्या पाहणीत मोठ्या प्रमाणावर मिश्र कचरा, बांधकामातील अवशेष आणि इतर कचरा टाकलेला आढळून आला. तसेच अशा प्रकारच्या कचऱ्याचे साठवण, प्रक्रिया किंवा विल्हेवाट लावण्यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (जीएसपीसीबी) किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी घेतलेली नाही.
व्हीजन ड्रिम सिटी या निवासी इमारतीच्या जवळ ही जागा असल्यामुळे दुर्गंधी, कीटकांचा त्रास आणि भूजल प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच ही जागा संरक्षित ऐतिहासिक किल्ल्याच्या भिंतीजवळ असल्याने त्या भिंतीला हानी पोहोचल्याचेही निदर्शनास आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.