Candolim Murder Case: कांदोळी येथे 14 आणि 08 वर्षांच्या मुलांची हत्या करून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने रविवारी गोवा हादरला. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे माहिती आता समोर येत आहे. पती- पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे आणि या वादातूनच जॉय यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ओर्डा-कांदोळी येथे जॉय फर्नांडिस हे त्यांची पत्नी इर्निया आणि दोन मुलांसह राहत होते. शनिवारी जॉय यांनी मोठी मुलगी अनानिया फर्नांडिस (वय 13) आणि मुलगा ज्योसेफ (वय 08) या दोघांची दोरीने गळा आवळत हत्या केली. यानंतर त्यांनी घरामागील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. शनिवारी रात्री ही घटना उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून प्राथमिक तपासात पती-पत्नीमध्ये वाद असल्याचं समोर आले आहे.
आठ वर्षांपासून बेरोजगार आणि पत्नीशी वाद
जॉय हे बरीच वर्षे तियात्र अकादमीत कामाला होते. जिल्हा पंचायत निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना नैराश्य आले होते. गेल्या आठ वर्षांपासून ते बेरोजगारच होते. मात्र, सामाजिक कामात जॉय सहभागी व्हायचे. जॉय आणि इर्निया या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे अशी माहिती समोर आली आहे. इर्निया या खासगी शाळेत शिक्षिका होता. पती- पत्नीमधील वादातूनच जॉय यांनी हे टोकाचं पाऊल उचलले असावे, असे समजते. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
लग्नसोहळ्यातून परतल्या अन्...
इर्निया शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घरी परतल्या होत्या. नंतर त्या एका विवाह समारंभात जायचे असल्याने मुले तसेच पती जॉय फर्नांडिस यांचा निरोप घेत घराबाहेर पडल्या. परंतु घरी येताच या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
कोण होते जॉय फर्नांडिस?
जॉय फर्नांडिस (Joy Fernandes) हे तियात्र कलेशी निगडित होते. राज्यातील ख्रिस्ती समाजात ते लोकप्रिय होते. कळंगुटचे माजी आमदार तसेच उपसभापती राहिलेल्या तोमाझीन कार्दोज यांच्या कार्यकाळात कला अकादमी पुरस्कृत तियात्र अकादमीवरही जॉय यांनी पाच वर्षे काम केले होते. गावातील चर्च संघटना तसेच एका राष्ट्रीय पक्षाच्या कळंगुट गट समितीवरही ते बराच काळ सक्रिय होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.