ओर्डा-कांदोळी : अरनॉल्ड सुवारिस यांचा संशयित मारेकरी अरविंद हा ओर्डा-कांदोळी येथे नातेवाईकांकडे राहायचा. अधून-मधून तो सुवारिस यांच्याकडे बारीक-सारीक कामासाठी घरगडी म्हणून जायचा. सुवारिस हे कॅनडा रिटर्न असल्याने त्यांच्याकडे पैसा आहे, याची जाण अरविंदला होती. त्यानुसार याच पैशांच्या हव्यासापोटी अरविंदने सुवारिस यांच्या घरी चोरीचा बेत आखला. त्यानुसार, गुन्हा घडलेल्या दिवशी अरविंद हा तयारीनेच सुवारिस यांच्या घरात शिरला होता.
सर्वात आधी अरविंदने घराची कौले काढली व वाशाला नायलॉन दोरी बांधून घरात प्रवेश केला. यावेळी मारेकऱ्याच्या पायाचे ठसे भिंतीवर उमटले होते. चोरीसाठी घरात शिरलेल्या अरविंदच्या चाहुलीने सुवारिस यांना झोपेतून जाग आली आणि अरविंद व सुवारिस यांच्यात झटापट झाली. यातच संशयिताने सुवारिस यांच्या पाठीवर कोयत्याने वार करून ठार मारले. पोलिसांना हा कोयता अजून जप्त करायचा आहे.
संशयित मारेकरी हा सुवारिस यांच्या परिचयाचा असावा, असा दाट संशय पोलिसांना होता. कारण पलायनासाठी त्याने सुवारिस यांचीच घरासमोरील पार्क केलेली कारगाडी वापरली. त्यामुळे गाडीची चावी कुठे असते, याची संशयितास पुरेपूर माहिती होती.
सुवारिस यांचा खून करून अरविंदने कारगाडी ही सिकेरी येथील आग्वाद हेलिपॅडवर सोडून म्हापशातून नंतर बसमार्गे कर्नाटकला आपल्या मूळगावी पसार झाला. यावेळी संशयित मारेकरी हा कर्नाटकला पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच, कळंगुट पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला.
त्यानुसार संशयितास कर्नाटकमधील जेरातगी गावातून ताब्यात घेतले. आणि रितसर अटक करून कळंगुट पोलिसांनी संशयितास मंगळवारी सायंकाळी उशिरा गोव्यात आणले. ही खुनाची घटना रविवारी (ता.१४) दुपारी १.४५ वा.च्या सुमारास उघडीस आली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक परेश नाईक तसेच पर्वरी पोलिस उपविभागीय कार्यालयातील सर्व पोलिस निरीक्षक व इतर पोलिसांच्या मदतीने विविध पथके स्थापन करून चोराचा पोलिसांनी मागोवा काढला.
संशयित हा दोन-तीन वर्षांपूर्वी सुवारिस यांच्याकडे घरगडी म्हणून कामाला यायचा. तेव्हापासून अरविंद हा सुवारिस यांना ओळखायचा, त्यामुळे सुवारिस यांच्या घरातील कोपरान्कोपरा अरविंदला माहिती होता.
सुवारिस हे स्वतःजवळ जास्त रोख पैसे ठेवत नसत व ते एटीएम कार्ड वापरायचे. अरविंदने घरातील काही विदेशी चलन चोरून नेले होते.
ओर्डा-कांदोळी येथे अरनॉल्ड सुवारिस (६८) यांच्या खून प्रकरणात कळंगुट पोलिसांनी २० वर्षीय अरविंद राजू पवार उर्फ परशु याला अटक केली. संशयित हा सुवारिस यांच्याकडे घरगडी म्हणून कामाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितास गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.
प्रथमदर्शनी हा चोरीच्या हेतूने खुनाचा प्रकार वाटत असला, तरी त्याला ‘नाजूक’ संबंधाची किनार असल्याचे सूत्रांकडून समजते. याच रागातून कदाचित काटा काढण्याच्या उद्देशाने संशयिताने टोकाचे पाऊल उचलले असण्याची वर्तविली जात आहे. परिणामी कळंगुट पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरू आहे.
बुधवारी (ता.१७) सकाळी संशयितास म्हापसा न्यायालयासमोर उभे केले असता, त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. उद्या (ता.१८) त्याला न्यायालयात पुन्हा रिमांडसाठी हजर केले जाईल. अरविंद सुवारिस यांची कार चोरून गावी विकण्याच्या बेतात होता; परंतु कार हेलिपॅडस्थळी नेल्यानंतर ती बंद पडली. कार पुन्हा सुरू होत नसल्याने अरविंदला ती तिथेच सोडून द्यावी लागली, असे सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.