Cancer Treatment in GMC: सज्जता कर्करोगाशी लढण्‍याची

गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी विभागात कर्करोग उपचारांची सुसज्ज अशी व्यवस्था केली गेली आहे
Cancer Treatment in GMC
Cancer Treatment in GMCDainik Gomantak
Published on
Updated on

अवित बगळे

Cancer Treatment in GMC: बांबोळीतील गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) परिसरात विभागीय कर्करोग उपचारकेंद्र आकाराला येणार आहे. त्याआधी गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी विभागात कर्करोग उपचारांची सुसज्ज अशी व्यवस्था केली गेली आहे.

या विभागात काम करणाऱ्या परिचारिकांना अत्याधुनिक उपचारांचे प्रशिक्षण मिळावे यासाठी सरकार आपल्या खर्चाने त्यांना मुंबईच्या टाटा कर्करोग उपचारकेंद्रात वर्षभराच्या प्रशिक्षणासाठी पाठवत आहे.

१३ परिचारिकांनाच ही संधी मिळणार आहे. या प्रशिक्षण काळात त्यांना सरकार वेतनही देणार आहे. कर्करोग बाह्यरुग्ण विभाग आणि रुग्णकक्ष गोमेकॉच्या इमारतीत होता. तेथे १५ खाटा होत्या. सुपर स्पेशालिटी विभागात ३० खाटांचा कक्ष या विभागाला मिळणार आहे.

Cancer Treatment in GMC
IVF Treatment in GMC: आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या पुढाकाराने गोमेकॉत आयव्हीएफ; अपत्यहीन जोडप्यांना वरदान

सदर विभागात प्रशिक्षित आणि अनुभवी असे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहेत. रुग्ण आपल्या आजाराच्या कोणत्याची टप्प्यावर या विभागात तपासणीसाठी आला की त्याच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार करायचे याचा निर्णय घेतला जातो.

कर्करोग झाला म्हणजे शस्रक्रिया केलीच पाहिजे असे रुग्णाला वाटते. कधी-कधी रुग्ण एकमेकांशी बोलतात आणि आपल्याला देण्यात येणाऱ्या उपचारांची तुलना करतात. पण या विभागात प्रत्येक रुग्णनिहाय उपचारपद्धती निश्चित केली जाते.

एकाच प्रकारचा कर्करोग दोन रुग्णांना असला तरी त्या आजाराच्या टप्प्यांनुसार उपचारांचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे रुग्णाला त्याला दिले तसे उपचार आपल्यावर केले नाहीत असे वाटू शकते. यासाठी रुग्णाशी संवाद साधून त्याला उपचारांची कल्पना दिली जाते. कधी-कधी औषधोपचारानेही रुग्ण बरा होऊ शकतो. त्याला तसा सल्ला दिला जातो. एखादी गुंतागुंत समोर आली तर वर उल्लेख केलेले तिन्ही शाखांचे वरिष्ठ डॉक्टर एकमेकांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढतात.

सुसह्य केमो पोर्ट पद्धतीचा वापर

रुग्णाला केमोथेरपी देताना मनगटाजवळ सुई खुपसून हे उपचार केले जातात. त्यामुळे हात काळा-निळा पडणे, हात फोडणे, हात सुजणे आदी त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यावर आता केमो पोर्ट ही पद्धती वापरण्यात येऊ लागली आहे. गळ्याच्या खाली आणि छातीच्या वर अशा भागात हा पोर्ट बसवण्यात येतो.

त्यामुळे सुई टोचून केमोथेरपी देण्याची वेळ येत नाही व हाताच्या त्रासापासून रुग्णाला मुक्ती मिळते. दर १५ दिवसांनी हा पोर्ट साफ केला जातो. उपचार पूर्ण झाल्यावर सहा महिने हा पोर्ट तसाच ठेवला जातो. रुग्णाला मुख्य उपचारांनंतर अन्य उपचार करावे लागले तर ही काळजी घेतली जाते. त्यानंतर तो पोर्ट काढून टाकला जातो. यामुळे प्रत्येक उपचारावेळी हातावर सुया टोचून घेण्याच्या त्रासापासून रुग्णाला मुक्ती मिळते.

चार वर्षांत गोमेकॉत ३०० रुग्णांवर उपचार

  • याआधी कर्करोगाचे प्राथमिक उपचार करण्याचीच सोय गोमेकॉत होती. सरकारला राज्याबाहेरील इस्पितळांत वा अन्य खासगी इस्पितळांत रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठा खर्च सोसावा लागत असे.

  • गेल्या चार वर्षांत कर्करोग व हृदयरोगविषयक ३०० रुग्णांवर गोमेकॉतच उपचार करण्यात आले आहेत.

  • काही रुग्णांना राज्यातील व राज्याबाहेरील खासगी इस्पितळांत उपचारासाठी पाठवावे लागले होते. त्यावर सरकारने चार वर्षात २०३ कोटी रुपये दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली खर्च केले.

  • आता सरकारने कर्करोग उपचारांची सोय गोमेकॉतच केल्याने या उपचारांसाठी मुंबई किंवा बेळगावच्या इस्पितळात जाण्याची गरज राहिलेली नाही.

रुग्‍णांसाठी इस्‍पितळात टीव्‍ही, पुस्‍तकांची सोय

कर्करोगावर उपचार घेताना रुग्ण इस्पितळात नाही तर तो कुठेतरी काही तासांसाठी आला आहे असे त्याला वाटावे असे अनौपचारिक वातावरण तयार करण्यावर भर दिला जात आहे. विदेशात डे-केअर सेंटर अशी संकल्पना आहे. तेथे रुग्णांना उपचार घेताना टीव्ही पाहण्याची सोय असते. उपचारांनंतर काही वेळासाठी विविध छंद जोपासण्याची व्यवस्था असते.

वाचनासाठी पुस्तके असतात. तसे केंद्र गोमेकॉत स्‍थापन केले जाणार आहे. आताही सकाळी उपचार केलेला रुग्ण काही तासांत घरी जाऊ शकतो. काही रुग्णांवर दीर्घकाळ उपचार चालतात. त्यांना दाखल करून घेण्यासाठी ३० खाटांचा कक्ष आहे. त्यातील काही खाटा या दिवसभरात उपचार घेऊन घरी परतणाऱ्या रुग्णांसाठीही वापरण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com