

मराठीत एक म्हण आहे, ‘नवी विटी, नवा डाव’. सध्या काणकोणातही असेच चालू आहे असे म्हणावे का0 असे म्हणतात, काणकोण पोलीस स्थानकाच्या कक्षेखाली येणार्या खाेल येथील काकोला या बीचवर एका रेव्ह पार्टीचे आयोजन केले असून त्यासाठी म्हणे एका सायबाकडेही सेटींग केले आहे. सध्या काणकोणात स्थायिक झालेल्या एका ब्रिटीश नागरिकाने या पार्टीचे म्हणे आयोजन केले आहे. यापूर्वी काणकोण भागात अशा रेव्ह पार्ट्यावर बर्यांपैकी नियंत्रण आणले गेले होते. मात्र आता असे काय झाले असावे की पुन्हा एकदा रेव्ह पार्टी आयोजकांनी आपले डोके पुन्हा वर काढले आहे? काणकोणात काही नवीन बदल झाले आहेत का? ∙∙∙
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. कामकाज सुरू असताना त्यात खंड पडू नये यासाठी उपसभापती किंवा एखाद्या आमदारास सभापतींच्या खुर्चीवर काहीवेळ बसता येते. भाजप सरकारच्यावतीने अधिकृतरित्या गणेश गावकर यांना सभापती म्हणून बसविले आहे. गावकर यांच्या कार्यकाळातील हे पहिलेच अधिवेशन. अधिवेशनाच्या दिवसांत आमदार नीलेश काब्राल यांना काही काळ सभापतींच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली. तेवढ्या वेळेत काब्राल यांनी आपल्या दमदार आवाजात विरोधी आमदारांना जागी बसण्याची जी तंबी दिली, ती पाहता सत्ताधारी भाजपच्या काही आमदारांना काब्राल हेच सभापती झाले असते तर बरे झाले असते, असेही वाटणे साहजिकच आहे. आता वेळ निघून गेली असली तरी यापुढील अधिवेशनात अधूनमधून काब्रालांना त्या जागेवर बसण्याची वारंवार संधी दिली गेली, तर त्यात आश्चर्य वाटायला नको. ∙∙∙
कोकणी ही गोव्याची राजभाषा असली तरी काही सरकारी संस्थांना त्याचा विसर पडला की काय अशी सध्या परिस्थिती दिसून येते. दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ कोकणी नेते उदय भेंब्रे यांनीही हीच खंत व्यक्त केली आहे. ओपिनियन पोल चळवळीमुळे गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम राहिले मात्र जे ज्यामुळे झाले तो १६ जानेवारीचा ‘अस्मिता दिन’ साजरा करण्याचे गोवा कोंकणी अकादमी, रवींद्र भवन, राजीव कला मंदिर यासारख्या संस्थांना विसर कसा पडला असा सवाल उदय भेंब्रे यांनी केला आहे. वास्तविक सध्या कोंकणीबद्दल गोव्यातील कोंकणी संस्थांना (आणि काेंकणी म्हालगड्यांनाही) काही पडून गेलेले आहे का? असे वाटावे अशी स्थिती आहे. गोवा कोंकणी अकादमी वाजपेयींची जयंती साजरी करते, पण अस्मिता दिन साजरे करण्याचे त्यांना पडून गेलेले नाही आणि यावर कुणीही कोकणी म्हालगडा काही बोललेले ऐकू येत नाही. अगदी उदय भेंब्रे सुद्धा कालपर्यंत या विषयावर काही बोलत नव्हते. मात्र आता उशिरा का होईना त्यांना कंठ फुटला. कोंकणीबद्दलची या म्हालगड्यांची अस्मिताय एवढी ‘दीन’ झाली आहे का? ∙∙∙
झेडपी निवडणुकीनंतर आता फोंड्यात पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. झेडपी निवडणुकीच्या वेळी ‘मगो’पासून फारकत घेतलेले डॉ. केतन भाटीकर हेही या निवडणुकीचे एक इच्छुक उमेदवार. पण आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी एक वेगळाच ‘धोरणी’ पवित्रा घेतल्याचे दिसून आले. दिवंगत रवी नाईक यांचे खरे राजकीय वारसदार हे फोंड्याचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंद नाईक हे असून त्यांना भाजपने पोटनिवडणुकीकरता उमेदवारी दिल्यास आपण या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहोत, असे ते म्हणाले. आता यातून त्यांनी रवींचे वारसदार म्हणून गणले जाणाऱ्या रवीपुत्र रितेश व रॉय यांना ‘गुगली’ टाकण्याचा प्रयत्न केला आहे, हे उघडच आहे.पण दिवंगत रवींचे पीए असलेल्या आनंद यांचे नाव या संदर्भात घेतल्यामुळे फोंड्यात एका नव्या वादाला फोडणी मिळू शकते, असेही बोलले जात आहे. पण डॉक्टरसाहेब फोंड्याचा आमदार कोणीही होऊ दे, पण रवींचा राजकीय वारसदार सापडणे सध्या तरी ‘मुश्किलही नही नामुमकीन है’ हे आम्ही नव्हे रवींच्या नियमित संपर्कात असणारे त्यांचे निकटवर्तीयच असे बोलू लागलेत. आता बोला... ∙∙∙
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड मंगळवारीच पक्की झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे पदाधिकाऱ्यांसह दिल्लीत होते. भाजयुमोत नबीन यांच्यासोबत दामू यांनी याआधी काम केले आहे. त्यांची व्यक्तीगत ओळखही आहे. दामू व ते समवयस्कही आहेत. त्यामुळे राजकीय जोशही सारखाच आहे. त्यामुळे दामू यांना त्यांच्याशी संवाद साधण्यास फार वेळ लागणार नाही. प्रदेशस्तरीय निर्णयांना श्रेष्ठींचा आशीर्वाद आता तत्काळ मिळण्याची सोय झाली आहे. दामूंची पक्ष संघटना व सरकारवर कशी पकड आहे, याचे दर्शन या दौऱ्यातून घडले आहे. त्यांनी नव्या अध्यक्षांचे अभिनंदन केले आहे. आज दिल्लीत होणाऱ्या प्रदेशाध्यक्षांच्या संमेलनात दामू हे सहभागी झालेत. दामू एकट्याने दिल्लीत जाऊन नेत्यांना आजवर भेटत आलेत. आता नव्या राष्ट्रीय अध्यक्षांशी दामू यांचे सूर जुळलेलेच असल्याने दामू यांच्या दिल्ली दौऱ्यात वाढ होईल. त्यांनीच सांगितल्यानुसार ते नेत्यांचे प्रगतीपुस्तक दिल्लीत सादर करत असतात. त्या प्रगतीपुस्तकानुसार कारवाई करण्यास नबीन यांच्याशी असलेली जवळीक त्यांना लाभदायी ठरेल, अशी चर्चा आहे. ∙∙∙
एक काळ असा होता, भारतीय जनता पक्ष देशाला कॉंग्रेसपासून मुक्त करण्यासाठी पुढे सरसावला होता. या त्यांच्या प्रयोगाला काही प्रमाणात देशातील इतर राज्यांमध्ये यश प्राप्त झाले. पण गोव्याचे काय? गोव्याला कॉंग्रेस मुक्त करण्याच्या प्रयत्नांत कॉंग्रेसमधील प्रथम दहा नंतर आठ मिळून १८ आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्याचा परिणाम सर्व गोमंतकीय आता अनुभवत आहेत. हल्लीच झालेल्या विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेसने जमिनीचे रुपांतरण केले, असा आरोप भाजपमधील मंत्री करताना दिसले. पण हेच लोक तर कॉंग्रेसमध्ये होते हे ते सोयीस्कर रित्या विसरले कसे? ज्या प्रकारे वाद विवाद झाला, ते पाहता भाजपही आता कॉंग्रेस मुक्तऐवजी कॉंग्रेस युक्त झाली आहे, असे लोक आता बोलू लागलेत. ∙∙∙
मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर काही एअरलाईन्स कंपन्यांनी आपला कारभार दाबोळीतून ‘मोपा’ला हलवला. असे प्रकार भविष्यातही सुरू राहतील. त्यामुळे ‘दाबोळी’वर येणाऱ्या विमानांत घट होऊन विमानतळ बंद पडणार असून, त्याचा फटका दक्षिण गोव्यातील हजारो व्यावसायिकांना बसण्याची भीती विरोधी आमदार प्रत्येक अधिवेशनात व्यक्त करतात. ‘पायलट’ असलेले विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तर दाबोळी बंद पडणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून वदवून घेत असतात आणि मुख्यमंत्रीही तसे काहीही होणार नाही, असे म्हणत विरोधकांना शांत करतात. पण, आता भाजप आमदार संकल्प आमोणकर यांनी अधिवेशनात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरातून जी आकडेवारी सादर केलेली आहे, त्यातून गेल्या तीन वर्षांत दाबोळीवर येणारी विमाने आणि पर्यटकांत घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा विषय विरोधी आमदार यापुढे कशापद्धतीने मांडणार? याकडे दक्षिण गोव्यातील जनतेचे लक्ष असेल. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.