Campal Walkway: कचरापेट्या गायब, मद्यपींचा अड्डा, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत; 'कांपाल वॉकवेची' दुरावस्था

Campal: सुमारे ८ कोटी रुपये खर्चून ‘स्मार्ट सिटी’ने हा ‘सायकल ट्रॅक’ आणि ‘वॉकवे’ बांधला होता
Campal: सुमारे ८ कोटी रुपये खर्चून ‘स्मार्ट सिटी’ने हा ‘सायकल ट्रॅक’ आणि ‘वॉकवे’ बांधला होता
Campal Walkway Panjim Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इमॅजिन पणजी ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत पणजी शहरात विविध विकासकामे आणि सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. असाच एक सौंदर्यीकरण प्रकल्प कांपाल येथे मांडवी किनारी साकारला होता. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या ‘वॉकवे’ची देखभाल करणे मात्र ‘स्मार्ट सिटी’ला जमले नाही. ‘वॉकवे’वरील कचरापेट्या गायब होऊ लागल्या आहेत. शिवाय मद्यपींचा अड्डाही हा ‘वॉकवे’ बनला आहे.

सरकारच्या कुठल्याही प्रकल्पाच्या उभारणीत लोकांच्याच करातून मिळणारा पैसा वापरला जातो. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन योग्यरित्या व्हावे, अशी सर्वांची अपेक्षा असते. परंतु नियोजनाअभावी सौंदर्यीकरणालाही बाधा पोहचू लागते. नंतर याच प्रकल्पांवर खर्चासाठी सरकारला स्वतंत्र निविदा जारी करावी लागते. परिणामी सरकारी तिजोरीला फटका बसतो.

सुमारे ८ कोटी रुपये खर्चून ‘स्मार्ट सिटी’ने ‘सायकल ट्रॅक’ आणि ‘वॉकवे’ बांधला होता. दररोज संध्याकाळी या ‘वॉकवे’वर युवा जोडपी पाहायला मिळतात. ज्या कामासाठी आणि जो उद्देश सरकारने समोर ठेवून हा ‘वॉकवे’ बांधला होता तो उद्देश जवळपास संपुष्टात आला आहे.

या ‘सायकल ट्रॅक’वर सायकल चालविताना कुणीच दिसत नाही. तसेच या ‘सायकल ट्रॅक’ची देखभालही नीटशी झालेली नाही. ‘सायकल ट्रॅक’वर आज सायकल चालविली तर घसरून खाली पडण्याचीच भीती अधिक आहे.

अत्याधुनिक पद्धतीने ‘वॉकवे’ बांधल्याचे दाखवण्यासाठी कचरापेट्या लटकवल्या होत्या. त्या गायब झाल्या आहेत. कधीतरी त्या गायब होऊ शकतात, किंवा त्या खाली पडू शकतात असा विचार त्या लावणाऱ्यांच्या मनाला शिवला नसेल का,अशी विचारणा तिथे विरंगुळ्यासाठी येणाऱ्यांना पडतो.

युवकांच्या होतात ‘ओल्या पार्ट्या’

या ‘वॉकवे’वर फिरायला येणाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. एकाने सांगितले की, ‘वॉकवे’चा वापर चालण्यासाठी झाला पाहिजे, मात्र याचा वापर चुकीच्या कामांसाठी केला जातो. काही युवक संध्याकाळी येथे दारूच्या पार्ट्या करून येथेच कचरा आणि रिकाम्या बाटल्या फेकून देतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कचरा उचलला जातो. आम्हा ज्येष्ठ नागरिकांना हवे तसे वातावरण कधीच मिळत नाही,अशी खंतही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

Campal: सुमारे ८ कोटी रुपये खर्चून ‘स्मार्ट सिटी’ने हा ‘सायकल ट्रॅक’ आणि ‘वॉकवे’ बांधला होता
Campal Ground Construction : कांपाल फुटबॉल मैदानाचे काम रेंगाळले ; 2014 मध्ये राज्य सरकारने दिली होती परवानगी

सुरक्षा रक्षक तैनात करा!

काही वर्षांपूर्वीच ‘वॉकवे’ बांधण्यात आला असला तरी येथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे काही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुर्तास येथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने निदान एक सुरक्षा रक्षक तरी नेमावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. ज्या दुर्घटना सध्‍या देशात आणि राज्यात घडत आहेत, ते पाहता प्राथमिक सुरक्षा लक्षात घेऊन पावले उचलली पाहिजेत,अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com