Calangute Shivaji Statue: कळंगुट-साळगाव रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा येत्या दहा दिवसांत हटवावा, असे निर्देश कळंगुट पंचायतीने शिवस्वराज्य संस्थेला दिले होते.
त्याविरोधात आज शेकडो शिवप्रेमींनी पुतळ्याजवळ जमून या निर्देशाला विरोध दर्शविला. येथे मोठ्या प्रमाणात जमाव एकवटला होता. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, काही लोकांकडून पंचायतीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी पंचायतीचे शटर बंद करून घेतले.
दरम्यान, येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जमावातून जय भवानी, जय शिवाजी, जय श्री राम आणि हर हर महादेव अशी घोषणाबाजी केली जात आहे.
हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल सरपंच सिक्वेरा यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जोपर्यंत सरपंच माफी मागत नाहीत तोपर्यंत येथून हटणार नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले होते की, कळंगुट पंचायतीकडून शिवरायांचा पुतळा उभारण्यापूर्वी परवानगी घेतली गेली नव्हती. अशाप्रकारे पुतळा उभारणे हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. त्यानुसार, शिवस्वराज्य व साबांखाला हा पुतळा हटविण्यास सांगितले आहे.
कळंगुट पंचायतीने या आदेशाची प्रत म्हापसा साबांखा कार्यकारी अभियंता तसेच गोवा राज्य पायाभूत सुविधा महामंडळास पाठविली होती. त्या विरोधात स्वराज्य कळंगुट संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आज, सकाळी 11 वाजता एकत्र येण्याचे आवाहन केले होते.
3 जून 2023 रोजी रात्री कळंगुट-साळगाव या मार्गावरील कळंगुट पोलिस स्थानकाच्या जंक्शनवर शिवस्वराज्य कळंगुट या संस्थेकडून शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. हा पुतळा बेकायदेशीर असल्याचे कळंगुट पंचायतीने निर्देशात म्हटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.