
Danielle McLaughlin Murder Trial
मडगाव: ब्रिटिश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन (२८) हिच्या खून प्रकरणात शुक्रवारी (ता.१४) दक्षिण गाेवा सत्र न्यायालयाने विकट भगत याला खुनाच्या आणि बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरविले. त्यामुळे आठ वर्षांपूर्वी घडलेल्या आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या या प्रकरणाची आठवण सर्वांना झाली आहे.
१६ मार्च २०१७ रोजी हा निर्घृण खून झाला होता. खून करण्यापूर्वी या युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याचेही मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीतून सिद्ध झाले होते.दरम्यान, या खुनामुळे काणकाेण पोलिस सुरवातीला बुचकळ्यात पडले होते. हा खून कुणी केला याचा थांगपत्ता त्यांना लागत नव्हता. मात्र, त्या भागातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजदेखील मिळवले आहे, ज्यामध्ये डॅनियली मॅकलॉग्लीन विकटबरोबर रस्त्यावरून चालत असल्याचे दिसून आले होते.
डॅनियली ही प्रवास करायला आवडणारी मुलगी होती. ब्रिटनमधील डोनेगल काऊंटी येथे राहणारी ही युवती यापूर्वीही गोव्यात आली होती. गोव्यातील समुद्र तिला आवडायचा. त्यामुळे ती वारंवार गाेव्यात यायची. २०१७ सालीही ती अशीच गोव्यात आली होती. वास्तविक ती हणजुणे येथील एका कॉटेजमध्ये वास्तव्य करून होती. मात्र, १७ मार्च रोजी काणकोणात होळीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या आणखी एका परदेशी मैत्रिणीबराेबर ती राजबाग-काणकोण येथे आली होती.
पोलिस तपासात जी माहिती पुढे आली त्याप्रमाणे, डॅनियली यापूर्वीही काणकोणात आली हाेती. तिची या प्रकरणातील दोषी ठरलेला आरोपी विकट भगत याच्याशी ओळखही होती. विकट हा अमली पदार्थांशी संबंधित व्यवसायात होता. विकटशी असलेल्या ओळखीतून डॅनियली त्याच्याबरोबर होळीच्या पार्टीत सामील झाली होती. त्यावेळी त्यांनी बऱ्याच प्रमाणात नशापान केले होते.
दुसऱ्या दिवशी राजबाग येथील एका निर्जन शेतात निर्वस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची शवचिकित्सा केली असता गळा आवळून तिचा खून केल्याचे उघड झाले होते. तिच्या अंगावर मारहाणीच्या जखमाही होत्या. विकट भगत करत असलेल्या लैंगिक अत्याचाराला विरोध करताना या जखमा झाल्याचा पोलिसांचा दावा असून तिच्या मेंदूलाही मार बसल्याने तिचा मृत्यू झाला होता.
होळीचा सण साजरा करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत विकट आणि डॅनियली एकत्र होती. नशेच्या अधीन असतानाच विकटने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर जवळपास सात वर्षे हा खटला रेंगाळला. त्यामुळे डॅनियली मॅकलॉग्लीनचे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते.
या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी यासाठी त्यांनी ब्रिटीश दुतावासाचाही आधार घेतला होता. ब्रिटीश दुतावासाकडून यासाठी प्रयत्न झाले होते. शेवटी आज या प्रकरणाचा निकाल लागल्याने डॅनियलीच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.
१४ मार्च २०१७ रोजी डॅनियली मॅकलॉग्लीनचा मृतदेह नग्न अवस्थेत काणकोण येथे सापडला होता. तिचा बलात्कार करून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून संशयित विकट भगत याला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान आपण बलात्कार करून खून केल्याची कबुली त्याने दिली होती. पोलिसांनी पंचानामा करून पुरावे गोळा करत असताना साक्षीदार तटस्थ राहणार याची खात्री केली. यासाठी पोलिस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई आणि पोलिस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांनी कंबर कसून डॅनियलीला न्याय मिळणार याची खात्री करणारे आरोपपत्र दाखल केले होते.
डॅनियली मॅकलॉग्लीनचा मृतदेह हा रक्तात माखलेल्या नग्न अवस्थेत आढळला होता. पुरावे एकत्रित केल्यानंतर साक्षीदार आपल्या जबानीवरून फिरणार नाहीत, हे आमच्यासाठी आव्हान होते. सुरवातीला आम्हाला काही आडकाठी आल्या; परंतु अखेर प्रकरणाला योग्य दिशेने नेऊन न्याय मिळाल्याचा आनंद झाला आहे. प्रकरणात आम्ही कमी पडणार नाही यासाठी वैयक्तिकरीत्या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहिलो. फिलोमिना कॉस्ता व इतर सहकाऱ्यांच्या साहाय्याने ही कामगिरी करता आली.
राजेंद्र प्रभुदेसाई, पोलिस उपअधीक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.