

नव्या बोरी पुलाची किती नितांत गरज आहे हे गेल्या पंधरवडाभरांत दुरुस्तीसाठी विद्यमान पूल दिवसभर बंद ठेवला त्यावेळी झालेल्या गैरसोयीवरून दिसून आले खरे पण तरीही नव्या पुलाच्या बांधकामाला होणारा विरोध थांबलेला नाही. आता तर नवा पूल लोकांच्या सोयीसाठी नाही तर कोळसा वाहतुकीसाठी बांधण्याचा प्रयत्न असल्याचा नवा शोध विरोध करणाऱ्यांनी लावला आहे. या पुलासाठी खाजन जमीन संपादली जाणार असल्याचा कांगावाही केला जात आहे, तर साबांखा त्याचा इन्कार करत आहे. या एकंदर घडामोडींत या पुलाची गरज असलेले हजारो प्रवासी गोंधळात पडले आहेत. कारण काही जण हा संपूर्ण प्रकल्पच बेकायदेशीर असल्याचा दावा करत आहेत त्यांत नेमके खरे काय त्याचा खुलासा सरकारने करण्याची गरज आहे. कारण यापूर्वी पणजीतील अटल सेतूबाबतही असेच प्रकार घडले व त्यामुळे बांधकामाला प्रचंड विलंब झाला होता व खर्च वाढला होता तसे बोरी पुलाचे झाले नाही म्हणजे मिळवले, असे प्रवासी म्हणू लागले आहेत. ∙∙∙
गोव्याच्या कला आणि संस्कृतीचे माहेरघर असलेल्या कला अकादमीच्या नूतनीकरण कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत विरोधकांनी अनेक महिने तत्कालीन कला आणि संस्कृती मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर गावडेंनी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीकास्र सोडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून हटवले, शिवाय कला अकादमीचे अध्यक्षपदही स्वत:च्या ताब्यात घेतले. कला अकादमीबाबत गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने चर्चा झाल्या, त्या पाहता कला अकादमी मुख्यमंत्री आपल्याकडेच ठेवतील असे वाटत होते. परंतु, त्यांनी कला अकादमीचे अध्यक्षपद माजी मुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्याकडे दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पण, बाबूंच्या निवडीने कला अकादमीबाबत भांडणाऱ्या कलाकारांना आनंद होणार? की ते पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयात जाणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळासमोर उभा आहे. ∙∙∙
जिल्हा पंचायत निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार की आघाडी करून हे स्पष्ट नसतानाच शिवसेनेने राज्य कार्यालयात शुक्रवारी होमहवन केले. कार्यालयात कामकाज सुरवात करण्यापूर्वी उत्तर गोवा प्रमुख सुनील सांतिनेजकर यांच्या हस्ते गणेश पूजा करण्यात आली. आफ्रान प्लाझा या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारतीत कार्यालय घेऊन शिवसेनेने दमदार सुरवात केली आहे. संपर्क नेते सुभाष सावंत यांना गोव्यातील राजकारणाची समज आहे. राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांच्याकडे धडाडी आहे. राज्यसचिव काशिनाथ मयेकर व दक्षिण जिल्हा प्रमुख गणबा देसाई यांच्याकडे लोकसंग्रह आहे. या साऱ्याचा उपयोग शिवसेनेला हातपाय पसरण्यासाठी कसा होईल याचे आडाखे बांधले जात आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात दडलेय तरी काय याचा अंदाज सध्या अनेकजण घेत आहेत. ∙∙∙
गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमनपद अखेर केदार नाईक यांना मिळाले. पद मिळविण्यासाठी कोणताही आतताईपणा न करण्याची भाजपमधील शिकवण त्यांच्या कामी आली, असे म्हणता येईल. मनोहर पर्रीकर यांच्या काळात केदार नाईक यांनी वेरे-रेईश मागूस या पंचायत क्षेत्रात भाजपचे भरपूर काम केले. सरपंचपदही त्यांनी भूषविले, परंतु गेल्या निवडणुकीत त्यांच्यावर पक्षनेतृत्वाने विश्वास ठेवला नाही आणि त्यांना काँग्रेसमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यांच्याच मतदारसंघाजवळील मायकल लोबो यांनीही काँग्रेसमध्ये उडी घेतल्याने केदार नाईक यांनीही त्यांच्याबरोबर उडी घेतली आणि दोघेही आमदार झाले. पण काहीच काळानंतर काँग्रेस फुटली, त्यात केदार नाईक होते. आता भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे, ते त्या पदाला किती न्याय देतील हे समजलेच. पण ते स्वतःच्या कारकिर्दीत पणजी ते वेरे रेईश मागूस हा प्रलंबित रोप-वेचा प्रकल्प मार्गी लावतील, अशी आशा त्यांच्या निकटवर्तीयांना आहे. ∙∙∙
किनारी भागातील खंडणीचा मुद्दा ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी उपस्थित केला. त्याबाबत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पालेकर यांनासुद्धा खंडणीला सामोरे जावे लागते का, अशी खोचक विचारणा केली. पालेकर यांचे वागातोर येथे रेस्टॉरंट आहे. त्यांना तसा अनुभव आला की, माहिती मिळाली, अशी विचारणा करत खंवटे यांनी यात वैयक्तिरीत्या लक्ष घालू असे आश्वासन देत खंवटे यांनी हा विषय हाती घेतला आहे. पालेकर यांच्याकडून माहिती घेऊ. मात्र, त्यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे दिले पाहिजेत, अशी गुगलीही खंवटे यांनी टाकली आहे. पालेकर हे वकील आहेत, त्यांनी खंडणीखोरीविषयी पोलिसांत तक्रार न करता जाहीरपणे आरोप का केला असावा, याचा अंदाज जो तो आपापल्या परीने लावत आहे. ∙∙∙
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गोविंद गावडे यांचीच चर्चा फोंड्यात सध्या सुरू आहे. पण ही चर्चा राजकारणी गोविंद गावडेंबाबत नसून कलाकार गोविंद गावडेबाबत रंगली आहे. कला अकादमी च्या राजीव गांधी कला मंदिर येथे सुरू असलेल्या कोकणी नाट्य स्पर्धेतील ‘देश राग’ या नाटकातील गोविंदानी साकारलेली बाळा राया मापारी या स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका लोकांना भलतीच आवडलेली दिसत आहे. त्यात परत आजच्या गोमन्तक मध्ये गोविंदानी अशा प्रकारची भूमिका यापूर्वी एका माहितीपटात केली होती, असे प्रसिद्ध झाल्यामुळे लोक आता या माहितीपटाचा शोध घेऊ लागले आहेत. काही का असेना पण कलाकार म्हणून तरी गोविंदाना ‘अच्छे दिन’ येऊ लागलेत एवढे निश्चित. ∙∙∙
सरकारने सध्या ‘माझे घर’ योजनेचा धडाका लावला आहे. या योजनेतील अर्ज वितरीत करण्यासाठी सध्या ते पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत आहेत व त्यामुळे विविध मतदारसंघातील आमदारांची दमछाक होत आहे. कारण एकाच दिवशी दोन ते तीन मतदारसंघात हे कार्यक्रम होत आहेत. असंख्य इच्छुकांतून मोजक्यांनाच निवडून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्ज दिले जात आहेत, त्यामुळे नेमकी कोणाची निवड करायची ही सुध्दा म्हणे डोकेदुखी ठरत आहे. कारण प्रत्येकाला दोतोरांकडून अर्ज हवा असतो. पण ज्या प्रकारे हे अर्ज नेले आहेत ते पाहता एकेका मतदारसंघात हजार ते दोन हजार ‘माझे घर’ लाभार्थी ठरणार आहेत. ती गती पाहिली तर भविष्यात एकही बांधकाम बेकायदेशीर उरणार नाही, असा तर्क मांडला जात आहे. तसे झाले तर पंचायती व गटविकास अधिकारी व मामलेदार कचेरींतील बांधकाम परवान्यांचे काम कमी होऊ शकते. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.