
पणजी : बोंडला प्राणी संग्रहालय महिनाभर बंद ठेवल्याच्या प्रकरणात आता मोठी कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. संबंधित प्रकरणात वन्यजीव विभागाचे संरक्षक आणि बोंडला प्राणी संग्रहालयाचे प्रभारी अधिकारी आयएफएस नवीन कुमार यांच्याविरोधात विभागीय स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या चौकशीदरम्यान संपूर्ण बंदच्या कालावधीत एकदाही प्राणी संग्रहालयास भेट न दिल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यामागील कारण म्हणजे, बोंडला येथे विविध प्रजातींच्या पाच रानमांजरांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्राणी संग्रहालय बंद ठेवले होते. मात्र, एवढ्या गंभीर स्थितीतही संबंधित अधिकाऱ्याने स्वतः तिथे भेट न देणे, तसेच सरकारला माहिती न देणे, हे अतिशय गंभीर आणि शासकीय कामकाजाच्या नियमांना धाब्यावर बसविणारे आहे. या प्रकरणात आगामी काळात अजून काही अधिकारीही चौकशीत अडकण्याची शक्यता आहे.
वन विभागामध्ये अशा प्रकारचे निष्काळजीपणाचे वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक प्रकरणात पारदर्शकतेने व जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. वन्यजीव आणि प्राणी संवर्धन हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. त्यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येतील.
केंद्राला अहवाल पाठविणार
वनमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता आणि मान्यताही न घेता प्राणी संग्रहालय बंद ठेवणे, ही गंभीर बाब आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली असून, सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.