Goa Bench Of Bombay High Court
Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak

Goa : वकील मारहाण प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून स्वेच्छा दखल; आज होणार सुनावणी

ॲड. गजानन सावंत मारहाणप्रकरणी राज्यातील वकील संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर पर्वरी पोलिस ठाण्यातील चार पोलिसांना काल मंगळवारी निलंबित करण्यात आले होते.

Goa Lawyers Police Conflict : ॲड. गजानन सावंत मारहाणप्रकरणी राज्यातील वकील संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर पर्वरी पोलिस ठाण्यातील चार पोलिसांना काल मंगळवारी निलंबित करण्यात आले होते. यात हवालदार संदीप परब आणि कॉन्स्टेबल महादेव नाईक, अमृत नागवेकर आणि मार्कूस गोम्स यांचा समावेश आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेतली असून आज 14 रोजी यावर सुनावणी होणार आहे.

वकील संघटनांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आश्‍वासन दिल्यानंतर पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. वकील संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्वेच्छा दाखल घेण्याची विनंती केली होती. या प्रकरणातील संबंधित दस्तावेज आज 14 रोजी न्यायालयात सादर केले जातील, असे संघटनांनी न्यायालयाला सूचित केले आहे.

ही घटना गुरुवारी 8 डिसेंबर रोजी घडली होती. पर्वरी पोलिसांनी ॲड. सावंत यांना जबर मारहाण करून त्यांच्या विरोधात तक्रार नोंद केल्यानंतर हे प्रकरण चिघळले होते. ॲड. सावंत यांच्या पत्नीने आपल्या पतीला केलेल्या मारहाणीची तक्रार नोंदवून न घेतल्याने म्हापसा आणि पणजी येथील वकिलांनी पर्वरी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेऊन तक्रार नोंदवण्यास भाग पाडले होते. मारहाण केलेल्या पोलिसांना त्वरित निलंबित करून अटक करण्याची मागणी वकील संघटनांनी केल्याने हे प्रकरण चिघळले होते.

ॲड. सावंत यांच्या म्हणण्यानुसार, प्रकरण खासगी स्वरूपाचे असून तेथे पोलिस असण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांनी आपल्या अशिलाच्या बाजूने प्रश्‍न केला, तेव्हा पोलिसांनी वाद घातला आणि नंतर सावंत यांना जबर मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर ॲड. सावंत यांना वैद्यकीय चाचणीसाठी गोमेकॉत नेण्यात आले. चाचणी केल्यावर त्यांचा जबड्याला फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले, तसेच त्यांच्या डोक्यावर वार केल्यामुळे मेंदूला सूज आल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले होते.

दोन्ही गटांकडून पोलिस अधिकाऱ्यांना साकडे

ॲड. सावंत आणि पोलिसांच्या कुटुंबीयांनी पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक यांना आपली कैफियत मांडणारे पत्र सादर केले. या प्रकरणाची न्याय्य आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करत ॲड. गजानन सावंत यांच्या कुटुंबीयांनी महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांचीही भेट घेतली. तर, संशयित पोलिसांच्या कुटुंबीयांनी पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची भेट घेऊन त्यांना पत्र सादर केले.

Goa Bench Of Bombay High Court
Goa : वास्कोतील 'त्या' दुचाकी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

रायबंदर येथे ‘चक्का जाम’!

ॲड. गजानन सावंत मारहाण प्रकरणी संशयित पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण शाखेसमोर राज्यातील वकील संघटनांनी धरणे आंदोलन केले. ॲड. सावंत यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना जोपर्यंत अटक केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी घोषणाबाजी यावेळी वकिलांनी केली. त्यातच वकिलांनी आपली वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी केल्यामुळे पणजी-जुने गोवे मार्गावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली.

अखेर आंदोलन मागे

रायबंदर येथे मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वकिलांनी ‘आम्हाला न्याय द्या’ अशा घोषणा दिल्या. गुन्हा अन्वेषण शाखेसमोर आंदोलन केल्यानंतर वकिलांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानी गेले. तेथे संशयित पोलिसांना निलंबित करणार असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

...असा आहे घटनाक्रम

  • पोलिसांकडून ॲड. सावंत यांच्या विरोधात तक्रार

  • ॲड. सावंत त्यांच्या पत्नीने केलेली तक्रार पर्वरी पोलिसांनी नोंदवली नसल्याने वकील संघटनांचा दबाव

  • वकिलांच्या दबावानंतर सात तासांनी पोलिसांच्या विरोधात तक्रार नोंद

  • प्रकरणात समावेश असलेल्या पोलिसांवर 307 (खुनाचा प्रयत्न) कलम लावले

  • पर्वरी पोलिस ठाण्यातून गुन्हा अन्वेषण शाखेकडे प्रकरण सुपूर्द

  • संशयितांना निलंबित करून अटक करण्यासाठी वकिलांनी सोमवारपर्यंत दिली होती मुदत

  • मंगळवारी रायबंदर येथे गुन्हा अन्वेषण शाखेसमोर वकिलांचे तीव्र आंदोलन

  • आंदोलनावेळी वकिलांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

  • मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर चार पोलिसांचे निलंबन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com