नवेवाडे येथील अपघातास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन चालकाला आपली मोटारसायकल चालविण्यास देणारा यामाहाचा मालक संजय यल्लेशपरी नाईक याला वास्को पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी काल ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केल्याची माहिती वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली.
दरम्यान सोमवारी नवेवाडे येथे अपघातात मृत्यू झालेली ममता शेट्ये हिच्यावर मंगळवारी दुपारी खारीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रकरणी अटक केलेल्या संजय नाईक याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचा रिमांड देण्यात आला असून अल्पवयीन संशयिताला 21 रोजी बाल न्यायिक मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.
सोमवारी सायंकाळी नवेवाडे येथे 59 वर्षीय ममता शेट्ये या महिलेला एका अल्पवयीन मुलाने दुचाकीची धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही हा १६ वर्षीय मुलगा वेगाने दुचाकी चालवत होता. त्याच्या आणि दुचाकीमालकाच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २७९, ३३७, ३०४ यासह ३४ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम ३,४,५ आणि १८०,१९९ अ उपकलम (२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी वास्कोचे पोलिस उपनिरीक्षक गणेश मातोंडकर हे पीआय कपिल नायक आणि डीवायएसपी सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.
चिखलीतील अपघाताच्या आठवणी जाग्या
20 दिवसांपूर्वी दाबोळी सेंट अँथनी न्यू चॅपेलसमोरील राष्ट्रीय मार्गावर बार्देश येथील एका अल्पवयीन मुलाने चारचाकी वाहनाने धक्का देऊन चिखली येथील महिला रिना गोन्साल्विस हिचे प्राण घेतले होते. सोमवारी (दि.12) त्याच पद्धतीने नवेवाडे येथील मुख्य रस्त्यावर अल्पवयीन मुलाने दुचाकीची धडक दिल्याने याच परिसरातील महिला ममता शेट्ये हिचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर वास्को पोलिसांनी अल्पवयीन दुचाकीचालकाला ताब्यात घेऊन त्याची मेरशी येथील अपना घरमध्ये रवानगी केली आहे.
अल्पवयीनांचे पालकही येणार गोत्यात
अपघातास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर मोटार वाहन कायद्यांतर्गत भा.दं.सं 304 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर अल्पवयीन मुलाचे पालक व अपघातात कारणीभूत ठरलेल्या वाहन मालकाविरोधातही गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.