Manohar International Airport: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेडणेतील टॅक्सी चालकांसाठी ब्लू कॅब अॅपची सुरवात राज्याच्या वाहतूक मंत्रालयाकडून करण्यात आली होती. (Goa Taxi)
तथापि, काही टॅक्सी चालकांकडून या ब्लु कॅब फॉर्मला विरोध दर्शवत या फॉर्मची होळी करण्यात आली.तर पुन्हा काळ्या पिवळ्या टॅक्सी स्टँडची मागणी करत, त्याची अंमलबजावणी न झाल्यास आरटीओ ऑफिसला घेराव घालण्याची मागणी टॅक्सी असोसिएशनचे पदाधिकारी सुदीप ताम्हणकर यांनी केली आहे.
ताम्हणकर म्हणाले की, ब्लु कॅब साठीचा हा फॉर्म आम्हाला मान्य नाही. हा फॉर्म म्हणजे मोटार व्हेईकल कायद्याची ही थट्टा आहे. कायद्याप्रमाणे मान्य केलेले फॉर्म न देता, १-१४ चे उतारे असलेले फॉर्म दिले आहेत.
मोपा एअरपोर्टवरील टुरिस्ट व्हेईकल ताबडतोब बंद झाल्या पाहिजेत. नाहीतर आरटीओ ऑफिसला घेराव घालू. हा फॉर्म मान्य नाही, म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही या फॉर्मची होळी करत आहोत.
सरकारने आत्ताच जागे व्हावे आणि काळी-पिवळी टॅक्सी स्टँड द्यावे. हे भारतीय जनता पक्षाचे सरकार नसून ब्रिटिश पार्टीचे सरकार आहे. टॅक्सी चालकांमध्ये फोडा आणि राज्य करा अशा नीतीचा अवलंब सरकारकडून केला जात आहे. हे स्वीकारार्ह नाही, असेही ताम्हणकर म्हणाले.
दरम्यान, मोपा विमानतळावरून प्रवाशी वाहतुकीसाठी सरकारने ‘गोवा टॅक्सी अॅप’ सुरू केले. दुसरीकडे पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांचे काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. सरकारने ही मागणी मान्य केली.
या टॅक्सींसाठी ‘ब्ल्यू कॅब अॅप’ सुरू केले. वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले यांनी यापुर्वी सांगितले होते की, वाहतुक मंत्रालयातर्फे पेडणेतील टॅक्सी चालकांसाठी ब्ल्यू कॅब सुरू करण्यात येईल. त्यामुळे यापुढे मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमातळावर पेडणेतील स्थानिक टॅक्सी चालकांसाठी आता काळी-पिवळी टॅक्सी नसेल. विमानतळावरील कायदा आणि सुव्यवस्था बाधित होऊ नये, याची खबरदारी घेतली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.