Sanquelim-Ponda Municipal Council Election: पालिकांमध्ये भाजप सुसाट, विरोधक भुईसपाट

मिशन साखळी फत्ते : 12 पैकी 11 जागा पटकावत मुख्यमंत्र्यांनी राखला गड; फोंड्यात 10 जागांवर यश
Election Result
Election Result Dainik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim-Ponda Municipal Council Election Result 2023: लक्षवेधी व प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या साखळी पालिका निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप गटाने पूर्ण बहुमत प्राप्त केले.

दोन बिनविरोध नगरसेवक निवडून आल्यानंतर एकूण दहा प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व दहाही जागा भरघोस मतांनी जिंकून भाजपने साखळी मतदारसंघातील अधिराज्य सिद्ध केले आहे.

या विजयामुळे संपूर्ण साखळी मतदारसंघ भाजपमय बनला असून हा विजय भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला समर्पित असल्याची भावना भाजप महिला प्रभारी तथा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी व्यक्त केली.

ही निवडणूक सर्व नव्या व जुन्या उमेदवारांसाठी अभ्यासपूर्ण ठरली. प्रभाग 2 मधून निकिता नाईक, 3 मधून सिद्धी प्रभू, 6 मधून विनंती पार्सेकर, 11 मधून दीपा जल्मी तर 12 मधून अंजना कामत या नवीन चेहऱ्यांनी साखळी पालिकेत प्रवेश केला, तर नगरसेवक धर्मेश सगलानी, कुंदा माडकर, राजेंद्र आमशेकर, सुनीता वेरेकर यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला.

मात्र, यशवंत माडकर, रश्मी देसाई, रियाज खान, ब्रह्मानंद देसाई, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर या नगरसेवकांनी आपले स्थान पुढील पाच वर्षांसाठी घट्ट केले आहे.

उमेदवार गीतेश माडकर यांनी यशवंत माडकर यांना पाठिंबा जाहीर केला होता, तर ज्योती गोसावी यांनी निकीता नाईक यांना पाठिंबा जाहीर केला होता.

Election Result
Anjuna Police: बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी नायजेरियन नागरिकला अटक

रश्मी देसाई नगराध्यक्ष?

प्रभाग क्र. 4 मध्ये धर्मेश सगलानी आणि रश्मी देसाई यांच्यात हाय व्होल्टेज लढत झाली. देसाई यांनी सगलानींचा पराभव करीत त्या जायंट किलर ठरल्या. रश्मी या अनुभवी नगरसेविका आहेत.

यावेळी साखळीचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे पहिल्या नगराध्यक्षा म्हणून देसाई यांच्या गळ्यात माळ पडू शकते. नवीन मंडळात एकूण सहा महिला नगरसेविका आहेत.

Election Result
Portuguese Language Day: पणजीत रंगला 'पोर्तुगीज भाषा दिन' समारोप सोहळा
Election Result
Election Result Dainik Gomantak

फोंडा पालिका निवडणुकीत भाजप पुरस्कृत आमदार रवी नाईक यांच्या नेतृत्वाखालील फोंडा नागरिक समितीचे आठ नगरसेवक निवडून आले. रायझिंग फोंडा या केतन भाटीकर यांच्या नेतृत्वाखालील गटाचे चार, तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला.

फोंड्यातील राजकारण पाहता, रवी नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर आपला करिष्मा कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले असून फोंडा पालिकेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.

फोंडा उपजिल्हाधिकारी संकुलात रविवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी भाजपचे आठ उमेदवार निवडून आले. दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते.

त्यामुळे भाजपच्या समर्थक नगरसेवकांची संख्या दहा झाली असून रायझिंग फोंड्याचे चार नगरसेवक निवडून आले. 2018 च्या निवडणुकीत रायझिंग फोंडा गटाचे सात उमेदवार निवडून आले होते, पण यावेळेला रायझिंग फोंड्याच्या हातून बहुमत निसटले.

माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक चौथ्यांदा पालिकेवर निवडून आले आहेत.

नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवड मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच कृषिमंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनानुसारच होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Election Result
Panjim News: मळा परिसरात रस्त्यावर टँकर उभा करण्यावरून तणाव

फोंडा नगराध्यक्ष : रितेश नाईकांच्या नावाची चर्चा

फोंडा पालिका निवडणुकीसाठी फोंडा नागरिक समिती नावाने पॅनेल तयार केले होते. त्याचे प्रमुख रवी नाईक होते.

त्यामुळे सध्या नगराध्यक्ष पदाचा चेंडू रवींच्या कोर्टात आहे. दरवर्षी एक याप्रमाणे पाच वर्षांत पाच नगराध्यक्ष होतील आणि पहिला क्रमांक रितेश नाईक यांचा लागेल, असे ऐकीवात आहे.

दोन भाऊ पालिकेत!

रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक व कनिष्ठ पुत्र रॉय नाईक यावेळेला बरोबर निवडून आले. फोंडा पालिकेत प्रथमच दोन भाऊ एकाचवेळी पालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश करणार आहेत.

रितेश नाईक हे विद्यमान नगराध्यक्ष आहेत, तर रॉय नाईक यांनी 2013 मध्ये निवडणूक लढवली होती; पण विजयी झाले नव्हते. मात्र यावेळेला रॉय नाईक यांना नगरसेवक बनण्याची संधी मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com