Goa BJP: जनतेसह कार्यकर्त्यांच्या मनातील चेहर्‍यालाच भाजपाची उत्तरेतील उमेदवारी; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

म्हापशात भाजपाच्या उत्तर गोवा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन
Goa BJP
Goa BJP
Published on
Updated on

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या मनात जो उमेदवार आहे, त्यालाच भाजपाचे तिकिट मिळणार आहे. सध्या काही बंधने असल्यामुळे उमेदवाराचे थेट नाव सांगू शकत नाही. परंतु, सर्वांचे प्रेम भाजपाला पुन्हा हवे असून गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात कमळ फुलेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

देशात भाजपाची मोठी लाट आली असून काँग्रेसमधील मोठमोठे नेते हे भाजपात प्रवेश करताहेत. कारण, काँग्रेसमध्ये भविष्य नाही हे सर्वांना समजले आहे. तसेच उत्तरेतील काँग्रेसची तिकिट कुणीच घेऊ पाहत नाही, कारण उत्तरेतील लोकांचा भाजपाला संपूर्ण पाठिंबा आहे आणि दीड लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्यांनी पराभव स्वीकरण्यापेक्षा निवडणूकीस उभे न राहिलेले बरे, असे काँग्रेसमधील नेत्यांना वाटते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

बुधवारी (ता.१४) सकाळी, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या उत्तर गोवा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, उपसभपाती जोशुआ डिसोझा, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उत्तरेतील भाजपाचे आमदार तथा नेतेमंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, भारत विश्वगुरु होण्याच्या मार्गावर असून लोकांचे सहकार्य गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पाळली. भाजपाच्या डबल इंजिनच्या सरकारामुळे गोव्यात मागील दहा वर्षात ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या. यात, मोपा विमानतळ, राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, अटल सेतू, झुआरी पूल यासारख्या लक्षवेधी प्रकल्पांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

आगामी लोकसभेत एकट्या भाजपाला ३७० पेक्षा अधिक, तर एनडीएला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला. तसेच, उत्तरेतून भाजपाचा उमेदवार हा दीड लाखापेक्षा अधिक मताधिक्क्यांनी तर दक्षिणेतून ६० हजारांचे मताधिक्क पक्षाला मिळेल असा दावा त्यांनी केला.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला दुसरा पर्याय नाही. तसेच मोदींचे नेतृत्व जगाने स्वीकारले आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीचा प्रश्न सोडविण्यात मोदींचा मोठा हातभार आहे. हा प्रश्न मार्गी लावून मोदींनी सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्रित आणले. यंदाच्या लोकसभेत एनडीए ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणार असा दावा त्यांनी केला.

सदानंद शेट तानावडे म्हणाले की, येत्या काही दिवसांमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीचा शेवट होईल, अशी टीका सदानंद शेट तानावडे तसेच मंत्री रोहन खंवटे यांनी केली. दरम्यान, यावेळी मंत्री नीळंकठ हळर्णकर, उपसभपाती जोशुआ डिसोझा, श्रीपाद नाईक, आमदार केदार नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com