Laxmikant Parsekar: पार्सेकरांची झाकली मूठ कायम, गूढ वाढले! तानावडे पुन्हा घेणार भेट; पाऊणतासाची बैठक निर्णयाविना

Laxmikant Parsekar: भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची काल रात्री भेट घेऊन सुमारे पाऊणतास राजकीय चर्चा केली.
Laxmikant Parsekar
Laxmikant ParsekarDainik Gomantak

Lok Sabha Election 2024: भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची काल रात्री भेट घेऊन सुमारे पाऊणतास राजकीय चर्चा केली. मात्र, पार्सेकर यांच्याकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. माझी भेट घेतली एवढ्याने कोणालाही राजकीय फायदा होत असेल, तर त्याने तो घ्यावा, असे उद्‍गार पार्सेकर यांनी या भेटीनंतर दै. ‘गोमन्तक’शी बोलताना काढले. यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान पार्सेकर यांच्या भूमिकेचे गूढ वाढले आहे.

पार्सेकर यांची काही दिवसांपूर्वी भाजपचे उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनी भेट घेतली होती. त्यावेळी पार्सेकर यांना विचारले असता काँग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला होता व तेही भेटायला येणार आहेत, असे त्यांनी सांगितले होते. काल रात्री तानावडे यांनी पार्सेकर यांना दूरध्वनी केला, तेव्हा पार्सेकर यांचे जेवण झाले होते. त्यानंतर तानावडे तिथे पोचले. त्यामुळे त्यांचे चहापानापुरतेच आदरातिथ्य पार्सेकर यांनी केले. तानावडे यांना या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, पार्सेकर आमचे जुने सहकारी, अद्यापही ते विचाराने दूर गेलेले नाहीत. त्यांना पक्षाकडून काही गोष्टी कळणे आवश्यक होते. त्या बाबी त्यांच्या कानावर घालण्यासाठी मी गेलो होतो. आमची बैठक उत्तम झाली.

मला कोणीही गृहीत धरू नये

पार्सेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की तानावडे यांनी दोन्ही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील याची माहिती मला दिली. मी ते ऐकून घेतले. मला मानणारा वर्ग राज्यभर आहे. भाजपने मला दिलेली सापत्नभावाची वागणूक माझे समर्थक अद्याप विसरलेले नाहीत. त्यामुळे त्यांची मते मला जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. मी विचाराने दूर गेलो नसलो, तरी मला कोणी गृहीत धरू शकत नाही. त्यांनी मला मतदानापूर्वी पुन्हा भेटू असे म्हटले आहे. ती भेट होईल तेव्हाच मी याविषयी जास्त काही सांगू शकेन. ते वरिष्ठांचा कोणताही निरोप घेऊन आलेले नव्हते.

Laxmikant Parsekar
Lok Sabha Election 2024: भाजपचा प्रचाररथ 'सुसाट'; 3 तारखेला अमित शाह यांची गोव्यात धडाडणार तोफ

राजकीय खेळीकडे अनेकांचे लक्ष:

लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या राजकीय भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. विधानसभेच्या पुढील निवडणुकीवर डोळा ठेवून ते कोणती राजकीय खेळी या लोकसभा निवडणुकीदरम्यान खेळतात याविषयीची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com