Goa News: विद्यमान भाजप सरकार हे गोवा, गोवेकर यांच्याविरोधात काम करीत आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा वारसा हे सरकार चालवत आहे का? की फक्त पर्रीकर यांचा केवळ नावापुरता वापर हे सरकार करीत आहे? याबाबत गोवेकरांनी विचार करणे आवश्यक आहे. म्हादईचा प्रश्र्न हे सरकार ज्या पद्धतीने हाताळत आहे.
ते पाहता हे सरकार बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी क्रांतीची गरज आहे, असे मत फातोर्ड्याचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. बंडखोरी करण्यासही धाडस लागते. हे धाडस उत्पल पर्रीकर यांनी गत विधानसभा निवडणुकीत करून दाखविले असेही ते म्हणाले.
सारस्वत समाज आयोजित तीन दिवसीय अन्न व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने सरदेसाई बोलत होते. यावेळी स्व. मनोहर पर्रीकर यांचे बंधू अवधूत, पुत्र उत्पल व अभिजात तसेच नगरसेवक घनश्याम प्रभू शिरोडकर, सिद्धार्थ सिनकर हे मान्यवर उपस्थित होते.
हा मेळावा म्हणजे सारस्वत समाजाच्या एकजुटीचे प्रतीक आहे. गोव्यात केवळ 3 टक्के सारस्वत समाज आहे. तरीसुद्धा इतर समाज सारस्वतांकडे पाहतो आहे. त्यांचे अनुकरण करतो आहे. सारस्वत युवकांनी समाजाचे प्रश्र्न हाताळावेत. हे प्रश्र्न कसे सोडवावेत, यावर त्यांनी उपाय शोधणे आवश्यक आहे. अन्यायाविरोधात आवाज उठविला पाहिजे, असे सरदेसाई म्हणाले. म्हादईचा प्रश्र्न हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नाही. तो पाण्याचा प्रश्र्न आहे.
गोव्याला जर पाण्याची कमतरता भासली तर मग मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
गोवा सारस्वत समाजाचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ ऊर्फ देश प्रभुदेसाई यांनी मेळाव्याचा उद्देश सांगितला. आयोजन समितीचे कार्यकारी अध्यक्ष राजेश प्रभू यांनी स्वागत, नवनाथ खांडेपारकर यांनी सूत्रसंचालन तर सचिव शिरीष पै यांनी आभार मानले.
परिसराला मनोहर पर्रीकरांचे नाव
अवधूत पर्रीकर यांनी मेळाव्याच्या आयोजकांचे अभिनंदन केले. सारस्वत समाज हा इतर समाजापर्यंत पोहोचला पाहिजे व त्यासाठी सर्वांची कृती त्या दिशेने होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. हा मेळावा बीपीएस क्लबच्या मैदानावर आयोजित करण्यात आला व परिसराला ‘पद्मभूषण’ स्व. मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर असे नाव देण्यात आले.
विजय सरदेसाई यांच्या हस्ते स्व. पर्रीकर यांच्या तसबिरीला पुष्पहार घालण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते मेळाव्यातील विविध स्पर्धांतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.