Goa Chanderi Festival: 'दुकानांचे परवाने रद्द करा, अन्यथा बाजारपेठ बंद' चंदेरी महोत्सवावरुन कुडचडेत वाद!

Goa Chanderi Festival: महोत्सवात मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यास परवानगी देण्यात येत असल्याने कुडचडे बाजारपेठेवर त्याचा परिणाम होणार आहे.
Curchorem Municipality
Curchorem Municipality Dainik Gomantak

Goa Chanderi Festival: कुडचडे येथे येत्या 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चंदेरी महोत्सवात मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यास परवानगी देण्यात येत असल्याने कुडचडे बाजारपेठेवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे हे परवाने रद्द न केल्यास संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याचा इशारा व्यापारी संघाने दिला आहे. या घडामोडीमुळे आयोजक आणि कुडचडे व्यापारी संघ यांच्यात तेढ निर्माण झाली आहे.

यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी पालिका मंडळ, स्थानिक आमदार नीलेश काब्राल, आयोजक आणि व्यापारी संघ यांची संयुक्त बैठक घेण्यात आली, परंतु त्यात ठोस असा काहीही मार्ग न निघाल्याने याच विषयावर परत एकदा बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

चंदेरी महोत्सव कुडचडे येते 22 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान होणार असून या तेरा दिवसांसाठी राज्यातून व राज्याबाहेरून विविध प्रकारची विक्री दालने दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत.

त्यातच सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी त्या ठिकाणी होत असते व खरेदी विक्री तेजीत होत असते. त्यामुळे बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवत असतो, असा व्यापारी संघटनेचा दावा आहे.

तोडगा काढण्याचा प्रयत्न असफल

कुडचडे व्यापारी संघटनेने ‘कार्यक्रम करा आमचे सहकार्य लाभेल व स्वागतही करू, पण स्टॉल्स उभारणीला परवानगी दिल्यास संपूर्ण बाजारपेठ बंद केली जाईल’ असा इशारा दिला आहे. त्यामुळे कुडचडे पालिका मंडळाने सर्वांना एकत्र आणून तोडगा काढण्याचा प्रयत्न करून पहिला, पण पहिल्या बैठकीत काहीच तोडगा निघू शकला नसल्याने बैठक अर्धवट स्थगित करण्यात आली.

Curchorem Municipality
Ravindra Bhavan Goa: तो ताजमहाल म्हणजे रवींद्र भवन तर नव्हे? 'खरी कुजबूज'

नीलेश काब्राल, स्थानिक आमदार-

चंदेरी महोत्सव व्हावा ही जनतेची इच्छा आहे. व्यापारी संघटनेने याला विरोध केला आहे. हा विषय सामोपचाराने सोडविण्याचा आपला प्रयत्न होता म्हणून बैठकीला हजर राहिलो. आता हा विषय सुटावा म्हणून वैयक्तिकरीत्या प्रयत्न केला जाणार असून शक्य झाल्यास कुडचडे व्यापारी संघाच्या व्यापाऱ्यांना या महोत्सवात समाविष्ट करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

सुभाष नाईक, चंदेरीचे आयोजक-

दरवर्षी हा महोत्सवाद्वारे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातच स्थानिक स्वयंसाहाय्य गटांना स्टॉल उभारण्यास संधी दिली जाते. यातून आयोजकांना आर्थिक मदत होत असली तरी पालिकेला दर दिवशी दहा हजार रुपये शुल्क भरण्यात येत असते. आयोजनासंदर्भात काही त्रुटी राहिल्यास पुढच्या वर्षी नक्कीच त्यात सुधारणा घडवून आणण्यात येतील.

रोश्या परेरा, अध्यक्ष, कुडचडे व्यापारी संघ-

चंदेरी महोत्सवाला आमचा कोणताही विरोध नाही, पण महोत्सवात थाटण्यात येणाऱ्या दीडशे स्टॉल्सना आमचा विरोध आहे. या स्टॉलमुळे आमच्या व्यवसायावर दरवर्षीच परिणाम होतो. त्यामुळे आता कोणत्याही स्थितीत आम्ही आमची भूमिका बदलणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com