

पणजी : सत्ता मिळवणे राजकीय पक्षांसाठी अनिवार्य असते. कारण विचार पुढे नेण्यासाठी सत्ताच महत्त्वाची असते, असे मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी व्यक्त केले. बांबोळी येथे बुधवारी आयोजित ‘पांचजन्य सागर मंथन’ कार्यक्रमातील मुलाखतीत ते बोलत होते.
सत्ता हातात आल्याशिवाय राजकीय पक्षांना विकास साधता येत नाही. किंबहुना आपले विचारही पुढे नेता येत नाहीत. त्यामुळे राजकीय पक्षांना सत्ता मिळवणे अनिवार्य असते. बारा वर्षांपूर्वी केंद्रात भाजपची सत्ता आली. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कलम ३७०’ हटवण्याचा निर्णय घेतला. देशभरातील जनतेचे अनेक प्रलंबित विषय सोडवले. त्यातील अनेक विषयांमुळे उदारमतवाद्यांचा पाठिंबाही भाजपला गमवावा लागला. परंतु, भाजपने जनतेला जी वचने दिलेली होती, ती पूर्ण करणे पक्षाची जबाबदारी होती, असे बी. एल. संतोष म्हणाले.
सत्ता मिळवणे हेच भाजपचे लक्ष्य आहे. परंतु ती सत्ता उपभोगासाठी नव्हे, तर राष्ट्रवादी विचार आणि मूल्ये पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे. सत्तेपेक्षा जनतेच्या मनात स्थान निर्माण करणे आणि त्यांचे प्रेम मिळवणे हे भाजपसाठी अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमचे प्रेरणास्थान आहे. संस्कार, राष्ट्रवादी विचार आणि नैतिक मूल्यांची प्रेरणा आम्हाला तिथूनच मिळते. परंतु, पक्ष संघटना चालवण्याचे पूर्ण अधिकार आम्हाला आहेत, असे संतोष यांनी स्पष्ट केले.
पक्ष संघटना बळकट करण्यावर भाजपचा नेहमीच भर असतो. लोकसभा निवडणुकीत ज्या १.०६ लाख बुथांवर भाजपचा पराभव झाला होता, त्या सर्वच बुथांचा गत लोकसभा निवडणुकीत गांभीर्याने आढावा घेण्यात आला.
चुकीची कारणे शोधण्यात आली आणि त्यावर काम करून तेथे विजय मिळवला, असे संतोष यांनी सांगितले. पुढील काळात केरळ, तामिळनाडू, पंजाब आणि पश्चिम बंगाल ही चार राज्ये जिंकण्याची तयारी आम्ही सुरू केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले...
कर्मचारी भरती आयोगाची स्थापना ही आपल्या सरकारची आतापर्यंतची सर्वांत मोठी उपलब्धी आहे. या निर्णयामुळे राज्यातील पात्र युवक–युवतींना सरकारी खात्यांत नोकऱ्या मिळत आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी कुणाकडेही जाण्याची गरज भासत नाही.
सरकारी खात्यांच्या अनेक परीक्षा, मुलाखतींची कटकट नाही. आयोगाकडून ‘सीबीटी’द्वारे होणाऱ्या परीक्षेचा निकाल पेपर सोडवताच मिळतो. त्यामुळे आयोगाच्या परीक्षांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हडफडेतील रोमियो लेन क्लबला आग लागून २५ जणांचा मृत्यू होण्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना रोखण्यासाठी रोमियो लेन प्रकरणाच्या चौकशीसाठी दंडाधिकारी, ऑडिट अशा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांच्या अहवालानंतर अशा क्लब, रेस्टॉरंटसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतील.
गेल्या सात वर्षांच्या काळात मुख्यमंत्री या नात्याने आपण नेहमीच जनतेच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेतले. ‘आत्मनिर्भर भारत–स्वयंपूर्ण गोवा’मुळे ग्रामीण भागांतील अनेक प्रश्न, समस्या कायमच्या मिटल्या.
बनावट कागदपत्रांच्या आधारे गोमंतकीयांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार वाढू लागल्यानंतर आपण विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. या पथकाने आतापर्यंत अनेक प्रकरणे निकाली काढली आहेत. देश-विदेशातील उद्योजकांनी गोव्यात येऊन उद्योग स्थापन करावेत, यासाठीही सरकारचे विविध प्रयत्न सुरू आहेत.
गोवा मुक्त होऊनही स्थानिकांची घरे आतापर्यंत त्यांच्या नावावर झालेली नव्हती. त्याचा फटका संबंधित घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना बसत होता. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि लोकांना त्यांच्या घरांचा कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी ‘माझे घर’ योजना सुरू करण्यात आली. जितके नागरिक यासाठी अर्ज करतील त्यांची घरे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायदेशीर केली जातील.
पक्षात शिस्त महत्त्वाची : भाजप लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे प्रत्येकाने पक्षात शिस्तीचे भान राखणे आणि सूचनांचे पालन करणे महत्त्वपूर्ण असते. याबाबतचे नियम केंद्रीय पातळीवर ठरत असले तरी त्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होत असते, असेही बी. एल. संतोष यांनी यावेळी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.