

बेताळबाटी: ‘भाजपसोबत काँग्रेसच्या वारंवार होणाऱ्या संगनमताला कंटाळलेले सर्व काँग्रेस कार्यकर्ते व समर्थकांचे मी ‘आप’मध्ये खुलेपणाने स्वागत करतो. भाजपला हरवायचे असेल आणि गोव्यात प्रामाणिक सरकार हवे असेल, तर त्यांचा पराभव केवळ‘आप’च करू शकते. ही लढाई राजकीय पक्षांची राहिली नाही, ती गोवा वाचवण्याची आहे, अशी साद आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी बेताळबाटी येथील भव्य जाहीर सभेत घातली.
या सभेला कोलवा येथील झेडपी उमेदवार अँटोनियो लिओ फर्नांडिस आणि बाणावली येथील उमेदवार जोसेफ पिमेंटा यांच्या प्रचारासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केजरीवाल यांनी उपस्थितांना विचारले, ‘आज गोव्यात लाच दिल्याशिवाय नोकरी मिळू शकते का?’ यावर उपस्थितांनी एकमुखाने ‘नाही’ असे उत्तर दिले, ज्यातून भ्रष्टाचाराची तीव्रता स्पष्ट झाली.
ते पुढे म्हणाले,‘सामान्य माणसाला लहान दुकान सुरू करणेही अवघड झाले आहे. पण लाच दिली तर बेकायदेशीर व्यवसाय मोकळेपणाने सुरू राहतात. इतर पक्षांचे आमदार निवडून आल्यानंतर कोट्यवधी कमावतात,पण ‘आप’चे आमदार प्रामाणिक आहेत. बाणावली आणि वेळ्ळीमधील लोकांना माहीत आहे की त्यांचे आमदार भ्रष्टाचारमुक्त आहेत.’
घराणेशाहीवर हल्ला करताना ते पुढे म्हणाले,‘गोवा कुठल्याही कुटुंबाने चालवू नये, मग ते राणे असोत किंवा आलेमाव. सामान्य गोयंकरांनी गोवा चालवावा.’ यावेळी सभेतील या गर्दीवरुन भ्रष्टाचाराविरोधातील जनतेचा संताप आणि ‘आप''वर वाढता विश्वास स्पष्ट दिसून आला.
हे तर हफ्ता वसुली सरकार!
कधीकाळी गोवा सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जात होता. आज गोवा हडफडे घटनेसाठी ओळखला जातो. त्या बेकायदा क्लबबद्दल अधिकाऱ्यांपासून मंत्री सगळ्यांना माहिती होती. हफ्ता दिला जात असल्यामुळे, असे क्लब सुरू होते. म्हणून हे हफ्ता वसुली सरकार आहे, असे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
‘ही निवडणूक केवळ ‘आप’च्या गेल्या साडेतीन वर्षांच्या कामावर लढली जाईल. आम्ही ना गुंडराज केला,ना घराणेशाही.आमचे राजकारण हे सेवेचे राजकारण आहे.आम्ही मोफत क्लिनिक्स सुरू केली आणि जिथे सरकार अपयशी ठरले तिथे लोकांच्या पाठिशी उभे राहिलो. - वेन्झी व्हिएगस, आमदार
बाणावली आणि वेळ्ळीत आमदारांनी केलेले काम म्हणजे ‘आप’चा गोवा मॉडेल'' आहे, घराजवळ आरोग्यसेवा, चांगले रस्ते, ना गुंडराज ना हफ्ता. हे मॉडेल आम्ही संपूर्ण गोव्यात राबवणार आहोत.माजी आमदारांना निमंत्रण आहे, त्यांनी आमचे क्लिनिक पाहायला यावं. आमचे काम पाहून तुमचा ‘बीपी’ नक्कीच वाढेल.
- ॲड.अमित पालेकर, ‘आप’ अध्यक्ष गोवा
आता खूप झाले.गोव्याला बदल हवा आहे. ही झेडपी निवडणूक म्हणजे त्या बदलाची सुरुवात आहे. संधीसाधू युतींना बळी पडू नका. ‘आप’ सुरुवातीपासून लोकांसोबत आहे आणि पुढेही राहील.
- क्रुझ सिल्वा, आमदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.