BITS Pilani: परीक्षेच्‍या तणावामुळेच आत्‍महत्‍या! बिट्‌स पिलानी प्रकरणावरती पोलिसांचा निष्कर्ष; हॉस्टेलमध्ये CCTV बसविण्‍याचा निर्णय

BITS Pilani Death News: दरम्‍यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्‍याचे आश्वावासन कॉलेज व्‍यवस्‍थापनाकडून मिळाल्‍यानंतर कसेराच्‍या कुटुंबीयांनी त्‍याच्‍या मृतदेहाची शवचिकित्‍सा करण्‍यास अनुमती दिली.
BITS Pilani
BITS PilaniDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: परीक्षेच्‍या ताणाखाली येऊनच बिट्‌स पिलानी या काॅलेजमध्‍ये शिकणारा नाेएडा येथील दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी कृष्‍णा कसेरा (२०) याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली असावी असा प्राथमिक निष्‍कर्ष पाेलिसांनी काढला आहे.

दरम्‍यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्‍याचे आश्वावासन कॉलेज व्‍यवस्‍थापनाकडून मिळाल्‍यानंतर कसेराच्‍या कुटुंबीयांनी त्‍याच्‍या मृतदेहाची शवचिकित्‍सा करण्‍यास अनुमती दिली. आज मडगावच्‍या जिल्‍हा इस्‍पितळात दोन तज्ञांच्‍या उपस्‍थितीत ही शवचिकित्‍सा करण्‍यात आली. गळफास घेतल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला असे या शवचिकित्‍सा अहवालात स्‍पष्‍ट झाले आहे.

मागच्‍या पाच महिन्‍यात बिट्‌स पिलानीच्‍या हॉस्‍टेलमध्‍ये राहणाऱ्या एकूण तीन विद्यार्थ्यांनी आत्‍महत्‍या केल्‍या असून या तिन्‍ही आत्‍महत्‍यांमध्‍ये परीक्षा हे समान सूत्र असल्‍याचे दिसून आले आहे. यापूर्वी ज्‍या दोन विद्याऱ्थ्यांनी आत्‍महत्‍या केल्‍या होत्‍या, त्‍या परीक्षेच्‍या काळात केल्‍या होत्‍या. याही प्रकरणात तेच कारण पुढे आले आहे. १ मे पासून या कॉलेजमधील परीक्षा सुरू व्‍हायच्‍या होत्‍या. त्‍यापूर्वी ३० एप्रिल रोजी कृष्णाने आपल्‍या खोलीच्‍या खिडकीच्‍या ग्रिल्‍सला दोरी बांधून आत्महत्या केली.

या आत्‍महत्‍येच्‍या घटनेनंतर कृष्‍णाच्‍या नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्‍थित केले होते, त्‍यात हॉस्‍टेलच्‍या कॉरिडोअरमध्‍ये सीसीटीव्‍ही कॅमेरे का बसविले नाहीत असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला होता. मात्र, असे कॅमेरे बसविण्‍यास विद्यार्थ्यांचाच विरोध होता. असे कॅमेरे बसविल्‍यास त्‍यांची गाेपनियता नष्‍ट होईल असे कारण कॉलेज व्‍यवस्‍थापनाकडून देण्‍यात आले. असे जरी असले तरी भविष्‍यात विद्यार्‍थ्‍यांच्‍या सुरक्षेसाठी काॅरिडोरमध्‍ये सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविण्‍यात येतील असे व्‍यवस्‍थापनाने स्‍पष्‍ट केले आहे, अशी माहिती मुरगावचे पाेलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी दिली.

BITS Pilani
BITS Pilani च्या वसतिगृहात उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांने घेतला टोकाचा निर्णय; 5 महिन्यांत तिघांनी संपवले आयुष्य

आवदा व्हिएगस यांचे प्राचार्यांना पत्र

दरम्‍यान, बायलांचो एकवोट या संघटनेच्‍या अध्‍यक्ष आवदा व्‍हिएगस यांनी बिट्‌स पिलानीचे प्राचार्य सुमन कुंडू यांना लिहिलेल्‍या पत्रात या घटनेची सखोल चाैकशी करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे. बिट्‌स पिलानीच्‍या हॉस्‍टेलमध्‍ये विद्यार्थ्यांचे रॅगिंग वगैरे तर होत नाही ना याचीही चाैकशी करावी असे त्‍यांनी पत्रात म्हटले आहे. विद्यार्थ्यांना बाहेरून येऊन कुणी सतावत आहेत का हे जाणुन घेण्‍यासाठी सगळीकडे सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवावेत आणि विद्यार्थी तणावाखाली आहेत का याचीही चाैकशी करावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी तक्रारपेटीची कॅम्‍पसमध्‍ये सोय करावी, अशी मागणी केली आहे.

BITS Pilani
Cyber Crime: गोव्यातील BITS च्या विद्यार्थ्यांनी बनवलं सायबर सुरक्षेचं 'ब्रह्मास्त्र'; थेट अमित शहांकडून कौतुकाचा वर्षाव

बिट्‌स पिलानीकडून अंतर्गत चाैकशी

या प्रकरणाची अंतर्गत चाैकशी करण्‍यासाठी बिट्‌स पिलानी व्‍यवस्‍थापनाने समिती नेमली असून कॅम्‍पसमधील अधिकारी पोलिसांशी समन्‍वय साधन आवश्‍‍यक ती पाऊले उचलणार असा खुलासा बिट्‌स पिलानीतर्फे करण्‍यात आला आहे. याव्‍यतिरिक्‍त विद्यार्थ्यांच्‍या सुरक्षेसाठी संस्‍था सर्वतोपरी प्रयत्‍न करीत आहे. विद्यार्थी तणावमुक्‍त असावेत यासाठी त्‍यांना क्रीडा व मनोरंजन सुविधा असलेल्‍या एक्‍टीव्‍हीटी सेंटरची वेळ रात्री उशिरापर्यंत वाढवली आहे. तसेच हे केंद्र रविवार आणि अन्‍य सुट्यांच्‍या दिवशीही उघडे ठेवले जाते. कॅम्‍पसमधील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र उघडण्‍यात आले असून हे केंद्र सदैव उपलब्‍ध असते. कुठलाही विद्यार्थी जर काही अडचणीत असेल, तर त्‍याने या समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com