

वास्को: वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला. सांकवाळ-झुवारीनगर येथे ‘बिट्स पिलानी’समोर रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दाबोळी येथील प्रवीण शिरोळकर (३१, मूळ कोल्हापूर) याचा मृत्यू झाला.
तसेच काल शनिवारी दांडो-वेळसाव येथे कारने धडक दिल्याने महावीर सास्तू राम (३२, मूळ बिहार) व त्याच रात्री डिचोली तालुक्यातील शिरगाव येथे झालेल्या दुचाकी अपघातात मंथन गोपीनाथ परब (२५ रा. मुळगाव) हे दोन युवक ठार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा कोल्हापूरचा आणि सध्या जयरामनगर-दाबोळी येथे वास्तव्यास असलेला प्रवीण शिरोळकर हा वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका फार्मा कंपनीत कामाला होता. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो दुचाकीने कामावर निघाला असता, सांकवाळ येथील ‘बिट्स पिलानी’ कॅम्पससमोर मागून येणाऱ्या ट्रकची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यामुळे प्रवीण दुचाकीसह रस्त्यावर फेकला गेला.
गंभीर जखमी अवस्थेत त्याला १०८ रुग्णवाहिकेतून चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी व एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. अपघातानंतर ट्रकचालक अजय दास (३५) घटनास्थळावरून ट्रकसह पळून गेला होता. नंतर त्याने वेर्णा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लग्नसमारंभ सोहळा आटोपून मध्यरात्री घरी परतत असताना शिरगाव येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या गटारात पडून दुचाकीस्वार मंथन गोपीनाथ परब (२५ रा. मुळगाव) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री शिरगाव येथील मुर्डी परिसरात घडली. मंथन हा शिरगावहून आपल्या स्कूटरवरून मुळगाव येथे घरी जात होता. शिरगावच्या धोंड तळीपासून पुढे काही अंतरावर पोहोचताच त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि स्कूटरसह तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारवजा चरीत कोसळला.
दांडो-वेळसाव येथे झालेल्या अपघातात महावीर सास्तू राम या युवकाला आपले प्राण गमवावे लागले. तो रस्त्यावरून चालला असता कारची त्याला जोरदार धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला कासावली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. कारचालक रामनाथ बिचोलकर (रा. बार्देश) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रिस्ली कार्व्हालो करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.