

पणजी: बर्च अग्नितांडव प्रकरणात २५ लोकांचा बळी गेला असून हा केवळ तांत्रिक गुन्हा नाही, तर अत्यंत गंभीर विषय आहे. केवळ राजकीय नेता आणि त्याची प्रतिमा हा विषय समोर ठेवून अंतरिम जामीन देणे योग्य नसल्याचा युक्तिवाद ज पोलिसांकडून करण्यात आला.
‘बर्च’ अग्नितांडव प्रकरणातील संशयित आणि स्थानिक पंचायत सरपंच रोशन रेडकर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सोमवारी अंतिम युक्तिवाद होणार आहे. यावेळी पोलिसांनी सरपंचाच्या पोलिस कोठडीची अत्यंत गरज असल्याचे सांगितले.
सरपंचाचा या प्रकरणात नेमका सहभाग किती आहे? बर्चमालकांनी जी बनावट कागदपत्रे तयार केली, त्यात सरपंचाची मदत होती का? हे सर्व प्रश्न अनुत्तरित असून त्याच्या कोठडीतील चौकशीशिवाय सत्य बाहेर येणार नाही. नाईट क्लबला परवानगी देण्याचे कोणतेही ठोस नियम नसताना सरपंचाने ही परवानगी कशी दिली, याची चौकशी होणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद देखील हणजूण पोलिसांनी यावेळी केला.
बर्च दुर्घटनेनंतर आम्ही फुकेतला पळून गेलो नव्हतो. आमचा फुकेतचा दौरा हा पूर्वनियोजित होता आणि आम्ही ट्रॅव्हल एजंटद्वारे प्रस्थान व परतीची तिकीट बूक केली होती. परतीचा प्रवास हा तीन दिवसांत होता.
मात्र, पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या साहाय्याने आमचा पासपोर्ट रद्द केला. त्यामुळे देशात माघारी येऊ शकत नव्हतो. तसेच बर्च दुर्घटना हा केवळ एक अपघात आहे. आपले पॅन-इंडिया म्हणजे देशभरात २७ आस्थापने असून या सर्व आस्थापनस्थळी आम्ही कर्मचारी नेमलेत व संबंधितांना जबाबदारी वाटून दिल्या आहेत.
त्यामुळे बर्च क्लबमधील आगीच्या दुर्घटनेला आम्हाला थेट जबाबदार धरता येत नाही, असा युक्तिवाद आज गौरव लुथरा याच्या वकिलांनी केला.
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमधील अग्नितांडवप्रकरणी हणजूण पोलिस स्थानकात क्लबचे मालक संशयित सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूंविरुद्ध गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात संशयितांनी म्हापसा जिल्हा अतिरिक्ति सत्र न्यायालयात आपला जामीन अर्ज दाखल केला आहे. शनिवारी लुथरांच्या जामिनावर सुनावणी झाली असता गौरव लुथरांकडून त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अद्याप हा युक्तिवाद पूर्ण झाला नसून, उर्वरित युक्तिवादावरील सुनावणी येत्या सोमवारी दुपारपर्यंत (१९ जानेवारी) तहकूब करण्यात आली.
सरपंच रेडकर यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले. संबंधित जमिनीवर २००५ पासून बांधकाम आहे. २०१६ मध्ये रिसॉर्टला परवानगी देण्यात आली, तेव्हा ते सरपंच नव्हते, असे रेडकर यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. रेडकर २०२२ मध्ये सरपंच झाले आणि ज्या घर क्रमांकाच्या आधारे परवानगी दिली, तो घर क्रमांक आणि त्याची घरपट्टी आधीच होती. घरपट्टीच्या पावतीवर आधारित कागदपत्रे पाहूनच पुढील प्रक्रिया केली जाते, असे ते म्हणाले.
हणजूण पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, क्लबमधून बाहेर पडण्यासाठी पुरेशी वाट नसल्याने २५ लोक दगावले. तसेच तिथे अग्निसुरक्षा उपकरणे नव्हती, असे सांगितले गेले. हे दावे खोडून काढताना लुथरांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, क्लबस्थळी सर्व अग्निसुरक्षा उपकरणे होती.
तसेच क्लबमधील कर्मचाऱ्यांना फायर ड्रीलचे प्रशिक्षण दिले गेले होते. याचे दस्तऐवज व छायाचित्र लुथरांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सादर केली. क्लबच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. तेव्हा तिथे १३० लोक होते. हे सर्वजण सुखरूप बाहेर पडू शकले. केवळ बेसमेंटमध्ये लोक होते, ते दुर्दैवाने धुरामुळे श्वसन मार्गातील अडथळ्यामुळे मरण पावले, असे सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.