Madgaon News : वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी खास एजन्सी नियुक्त केलेली असतानाही उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार मडगावात सुरुच आहेत. विशेषतः कोंब प्रभागात अशा प्रकारे टाकलेला वैद्यकीय कचरा हटविल्यावर त्याच ठिकाणी पुन्हा असा कचरा आढळून आला आहे.
नगरसेवक दादा नायक यांनी या संदर्भात मुख्याधिकारी रोहित कदम यांच्याकडे संपर्क साधल्यावर त्यांनी बाजार निरिक्षक संजय सांगेलकर यांना पाठविले. त्यांनी केलेल्या पाहणीत तेथे कालबाह्य ठरलेल्या गोळ्यांची असंख्य पाकिटे आढळली. कचरा दोन ते तीन आस्थापनांचा असल्याचेही स्पष्ट झाले.
नायक यांनी मुख्याधिकाऱ्यांना हे प्रकरण गांभिर्याने घ्यावे व कोणती वैद्यकीय आस्थापने अद्याप कचरा गोळा करणाऱ्या एजन्सीशी नोंदणी केली नाही ते तपासावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, दोन महिन्यापूर्वी मडगावातील कोंबवाड्यावरील याच ठिकाणी मोठ्याप्रमाणात असाच कचरा आढळून आला होता.
काही दिवसांपूर्वी गोवा मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजी फॅकल्टी शवागार विभागाच्या मागे, मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकण्यात आला होता. यामुळे गोमेकॉचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला होता.
हा कचरा आढळण्यापूर्वी आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी हॉस्पिटलला भेट देऊन विभागांची पाहणी केली होती. त्यामुळे बायो मेडिकल कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत आरोग्य विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.