

डिचोली: सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या डिचोली तालुक्यात भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे. तालुक्यातील चारही जिल्हा पंचायत मतदारसंघांत भाजपने दणदणीत विजय प्राप्त केला. लाटंबार्से, मये आणि पाळी या मतदारसंघांत भाजपचे नवे ‘झेडपी’ निवडून आले आहेत तर कारापूर-सर्वणमधून भाजपचे महेश सावंत सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
ही निवडणूक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकपूर्व ही लढत ‘सेमीफायनल’ म्हणून पाहिली जात होती. मात्र मुख्यमंत्री व दोन्ही आमदारांनी ही ‘सेमीफायनल’ जिंकत भाजपची ताकद पुन्हा सिद्ध केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाळीत भाजपला विक्रमी आघाडी मिळाली. निकालानंतर आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. हा विजय भाजपच्या कार्यकर्त्यांचा असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट तसेच सुलक्षणा सावंत यांनी व्यक्त केली.
महिलांसाठी राखीव असलेल्या मये मतदारसंघात भाजपने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. या पक्षाच्या कुंदा मांद्रेकर यांनी ३८१३ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी गोवा फॉरवर्डच्या प्रा. राधिका कळंगुटकर यांना २८३७ तर अपक्ष उमेदवार राधा कोरगावकर यांना २८०४ मते मिळाली. ‘आप’च्या पर्पेट डिसोझा यांना केवळ ६६० मते मिळाली.
कारापूर-सर्वणमध्ये भाजपचे महेश सावंत हे १७४४ मतांच्या आघाडीने विजयी होत सलग दुसऱ्यांदा ‘झेडपी’ म्हणून निवडून आले. त्यांना ६२३४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार अॅड. अजय प्रभुगावकर यांना ४४९० मते मिळाली. गोवा फॉरवर्डचे स्वप्निल फडते यांना १६२२, ‘आप’चे राज गावकर यांना २१० तर अपक्ष अनिल नाईक यांना २६५ मते प्राप्त झाली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पाळी जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपने विक्रमी विजय नोंदवला. या पक्षाचे सुंदर नाईक यांनी तब्बल ९२५१ मताधिक्क्य प्राप्त केले. त्यांना १०,९१४ तर काँग्रेसचे भानुदास सोननाईक यांना केवळ १६६३ मते मिळाली. मागील जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला येथे ४०४० मतांची आघाडी मिळाली होती. यावेळी ती दुप्पट झाली आहे. या विजयाचे श्रेय सुंदर नाईक यांनी मुख्यमंत्री व कार्यकर्त्यांना दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.