डिचोली: डिचोली (Bicholim) शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनत असून, या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांचे चावे घेण्याचे प्रकारही घडत आहेत. शहरातील कदंब बसस्थानकावर दोन प्रवाशांचे कुत्र्यांनी चावे घेतल्याची माहिती काही दुकानदारांकडून देण्यात आली. शहरातील या भटक्या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा. अशी मागणी ग्राहक, प्रवासी आणि जनतेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शहरातील भटक्या कुंत्र्यांचे लवकरच निर्बीजीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती पालिकेकडून मिळाली आहे.
शहरात मुक्त संचार
शहरात सर्वत्र सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कळपाकळपाने ही कुत्री शहरात दिवसरात्र हिंडत असतात. यात काही कुत्री अशक्त आणि जखमी अवस्थेत आढळून येत आहेत. रस्त्यावर भटणाऱ्या कुत्र्यांमुळे अधूनमधून अपघातही घडत असतात. रात्रीच्यावेळी तर ही कुत्री जोरजोरात भुंकत असल्याने नागरिकांची झोपमोड होत असते. एकंदरीत ही भटकी कुत्री नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
कुत्र्यांकडून चावे
बाजार परिसरासह शहरातील कदंब बसस्थानकावरही भटक्या कुत्र्यांचा संचार वाढला आहे. काही कुत्री प्रवाशांच्या गर्दीत बसस्थानकावरच ठाण मांडून असतात. बऱ्याचदा ही भटकी कुत्री प्रवाशांच्या अंगावरही धावून जात असतात. गेल्या आठवड्यात बसच्या प्रतीक्षेत बसस्थानकावर बसलेल्या एका युवतीचा कुत्र्याने चावा घेण्याचा प्रकार घडला आहे. तत्पूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाचाही कुत्र्याने चावा घेतला होता. अशी माहिती बसस्थानकावरील दुकानदारांकडून मिळाली आहे.
खाद्यासाठी कुत्र्यांकडून हल्ले
संचारबंदी काळात बसस्थानकावर नियमित येणाऱ्या काही महिला प्रवाशांकडून श्वान प्रेमापोटी बसस्थानकावरील या कुत्र्यांना बिस्कीट आदी खाद्यपदार्थ देण्यात येत होते. या कुत्र्यांना त्याची चटक लागली आहे. खाद्य मिळाले नाही, की ही कुत्री प्रवाशांच्या अंगावर धावून जात असावीत. त्यातूनच चावे घेण्याचे प्रकार घडत आहेत.
-यशवंत पळ, दुकानदार.
निर्बीजीकरणासाठी करार
शहरातील भटक्या कुत्र्यांना लवकरच रॅबिज प्रतिबंधात्मक लस टोचण्यात येणार असून, निर्बीजीकरणही करण्यात येणार आहे. त्यासाठी 'मिशन रॅबीज' या संघटनेशी करार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्राणी मित्र एनजीओंना या करारात सामावून घेण्यात येणार आहे.
-विजयकुमार नाटेकर, नगरसेवक, डिचोली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.