

डिचोली: रुंदीकरण करण्यात आलेल्या ‘सेतू संगम’ ते पोलिस क्वार्टर्सपर्यंतच्या रस्त्यावर लोकार्पणापूर्वीच वाहने पार्क करण्याचे प्रकार वाढले असून, या प्रकाराबाबत जागरूक नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. संभाव्य धोका ओळखून या रस्त्यावरील ‘पार्किंग’वर वेळीच बंदी घालावी, अशी आग्रही मागणी आता स्थानिकांसह वाहनचालकांकडून होत आहे.
रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावरील वाहने पार्क करण्याचे प्रकार पाहता, हा रस्ता पार्किंगसाठीच रुंद केला आहे की काय, असाही प्रश्न जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत. या रस्त्यावर सध्या दोन्ही बाजूंनी अवजड वाहनांसह चारचाकी वाहने पार्क करून ठेवली जातात.
रात्रीच्या वेळी तर पार्किंग केलेल्या वाहनांची संख्या मोठी असते. पार्किंगमुळे या रस्त्यावर अधूनमधून अपघातही घडत असतात. या बेकायदा पार्किंगवर वेळीच प्रतिबंध केला नाही, तर भविष्यात या रस्त्यावर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम बाकी
‘सेतू संगम’ प्रकल्पस्थळ ते पोलिस क्वार्टर्सपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. एक वर्षापूर्वी हाती घेण्यात आलेले हे काम मध्यंतरी काहीसे मंदावले होते. साडेसात कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून ‘जी-सुडा’च्या सहकार्याने हे काम करण्यात आले आहे.
वर्षभरापूर्वी रुंदीकरणाच्या कामाला हात घालण्यात आला होता. मात्र, हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम सोडल्यास या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे, अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
पार्किंगची समस्या
रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी स्थानिकांनी सहकार्य करताना अडथळा ठरणारी बांधकामे स्वतःच हटवली आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग सुकर झाला. मात्र, आता या रस्त्यावर पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.