
डिचोली: उष्णतेचा पारा वाढत असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून डिचोलीत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपाछपीचा खेळ सुरू असून ग्राहक वीज समस्येने पुरते हैराण झाले आहेत.
कारापूरसह सर्वण, मये भागात रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित झाला की, आधीच उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक पुरते हैराण होत आहेत. सध्या परीक्षा सुरू असून शाळेच्या वेळेत वीज गेली, तर विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही मुश्किल होते अशी तक्रार आहे.
रात्रीच्यावेळी वीज गुल झाली, की अक्षरशः हाल होतात, असे मये येथील रवींद्र गोवेकर या ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. दरम्यान, शिमगोत्सवानिमित्त गावोगावी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आल्याने वीज पुरवठ्यावर ताण येत आहे. त्यामुळेच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत, असे वीज खात्यातील एका लाईनमनचे म्हणणे आहे.
राज्यात तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. पुढील सात दिवस तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या २४ तासांत मुरगाव तालुक्यात सर्वाधिक ३४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील ४८ तासांत आकाश अंशतः ढगाळ राहील तर वातावरणात धुक्याची दाट शक्यता आहे.
तापमानात फारसा बदल होणार नाही. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. सापेक्ष आर्द्रतेतही वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. पणजीत सापेक्ष आर्द्रता ८९ टक्के तर मुरगावात ८४ टक्के इतकी नोंदवली गेली, जी सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे उष्ण आणि आर्द्र हवामानाचा अनुभव गोमंतकीयांना पुढील काही दिवस जाणवण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.