

डिचोली: डिचोली पोलिसांनी एका धाडसी कारवाईत खरपाल-दोडामार्ग येथील एका घरफोडी प्रकरणी पश्चिम बंगालमधील टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील तिघेही चोरटे युवक असून या चोरट्यांनी गोव्यासह महाराष्ट्रात अन्य काही घरफोड्या केल्याची माहिती समोर आली आहे.
डिचोली पोलिसांच्या एका पथकाने मंगळवारी रात्री उशिरा माडेल-थिवी येथील एका भाड्याच्या खोलीवर धाड मारून ही कारवाई केली. अरिफफूल अनारुल मंडल (वय-२२) बाप्पा खगन मंडल (वय २३) आणि अली आझम अनिचूर मुल्ला (वय-३०) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे असून, तिघेही पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या भागात राहणारे आहेत.
पोलिसांनी ज्या भाड्याच्या खोलीवर धाड मारली, त्या खोलीतून एलईडी टिव्ही, गिझर, पंखे, मोबाईल फोन मिळून चोरलेल्या ४३ किमती वस्तू जप्त करण्यात यश मिळवले आहे. एक दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. जप्त केलेला ऐवज पाच लाखांहून अधिक किमतीचा असल्याची माहिती मिळाली आहे.
अन् पोलिसांची कारवाई!
उपलब्ध माहितीनुसार गेल्या ७ एप्रिल रोजी रात्री ते ८ एप्रिल पहाटेच्या दरम्यान, गोवा दोडामार्ग सीमेलगत असलेल्या खरपाल येथील जयंद्र गावस यांचे घर फोडून रोख रकमेसह घरातील किमती ऐवज लंपास केला होता.
पोलिसांच्या या टीमने २२ वर्षीय मुख्य आरोपी अरिफफूल अनारुल मंडल राहत असलेल्या थिवी-माडेल येथील भाड्याच्या खोलीवर धाड मारून ही कारवाई केली. पोलिसांच्या या टीममध्ये एएसआय लक्ष्मण घाडी, हवालदार आत्मा गावकर तसेच पोलिस कॉन्स्टेबल दयेश खांडेपारकर, रुपेश घुरे, विशाल परब, संदीप पावले आणि सिद्धनाथ नाईक यांचा सहभाग होता.
बंगालमधील टोळी
थिवी-माडेल येथील कारवाईत पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अरिफफूल अनारुल मंडल याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, आरोपी अरिफफूल याने बाप्पा खगन मंडल (वय-२३) आणि अली आझम मुल्ला (वय-३०) या साथीदारांची नावे उघड केली.
उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक हरिष मडकईकर, डिचोलीची पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही आणि पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.