

डिचोली: डिचोली पालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामे संथगतीने सुरू असून, अजून ५० टक्केही काम पूर्ण झालेले नाही, अशी माहिती मिळाली आहे.
मोसमी पावसाची चाहूल लागली असतानाही अजून बहुतांश कामे अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. मोसमी पाऊस वेळेवर सुरू झाला आणि तोपर्यंत कामे पूर्ण झाली नाहीत, तर यंदा मान्सूनपूर्व कामांचे तीनतेरा वाजणार, हे जवळपास निश्चित आहे.
पालिका क्षेत्रातील दोन-तीन प्रभाग वगळता अन्य प्रभागांतील पावसाळापूर्व कामे अर्धवट आहेत. दुसऱ्याबाजूने नदीला जोडलेल्या शहरातील नाल्यातील गाळ उपसण्याचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही.
बावीस दिवसांपूर्वी शहरात मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे करण्यासाठी कर्नाटकातून खास कंत्राटी कामगारांना पाचारण करण्यात आले आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा, पाणी तुंबणे आणि अन्य समस्या उद्भवता कामा नये यासाठी दरवर्षी गटार, नाले उपसणे आदी कामे करण्यात येतात.
या कामांतर्गत पालिका क्षेत्रातील चौदाही प्रभागांतील गटार उपसण्यात येणार आहेत. मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी पालिकेतर्फे ९.५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिका मंडळाचा कार्यकाळ संपल्याने पालिका अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ही कामे करण्यात येत आहेत.
दरम्यान, पावसाळापूर्व कामे संथगतीने सुरू असल्याने माजी नगरसेवकांसह पालिका निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गाळ उपसा पडला लांबणीवर!
शहरातील शांतादुर्गा विद्यालयासमोरील नदीला जोडलेल्या नाल्यातील गाळ उपसण्याचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही. नाल्यातील गाळ उपसण्यासाठी चार दिवसांपूर्वी जेसीबी यंत्र या नाल्यात उतरविले होते. मात्र, ते चिखलात रुतल्याने बाहेर काढण्यात आले.
त्याच्यानंतर जेसीबी यंत्राचा पत्ताच नाही. या नाल्यातील गाळ उपसला नाही, तर पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. शहरातील आतीलपेठ, नाईकनगर आदी काही प्रभागातील काही भाग वगळता अन्य प्रभागांतील गटारे उपसण्याचे काम अर्धवट अवस्थेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.