

डिचोली: नाताळ हा उत्साह द्विगुणित करणारा सण होय. हा सण जवळ आल्याने घरोघरी लगबग वाढली आहे.
नोकरीधंद्यानिमित्त परदेशात असलेले ख्रिस्तीबांधव मूळस्थानी येऊ लागले आहेत. बाजारातही ''ख्रिसमस''चा उत्साह दिसत आहे.
विविध साहित्याने बाजारपेठ सजली आहे. डिचोली शहरात ख्रिस्ती बांधवांची लोकसंख्या कमी असली तरी येथील ख्रिस्ती बांधव नाताळ सण परंपरेप्रमाणे मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा करतात. हिंदूही या सणात मोठ्या उत्साहात सहभागी होतात.
बाजारपेठेत गोड पदार्थांना मागणी
शहरातील अनेक दुकाने सध्या ख्रिसमस साहित्याने सजली आहेत. विविध प्रकारची नक्षत्रे, ख्रिसमस ट्री, स्नोबॉल, सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या, तयार गोठे आदी साहित्याने बाजारपेठेला नवा साज चढला आहे. या साहित्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू असून बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. घरोघरी करंज्या आदी गोडधोड खाद्यपदार्थ बनविण्याची लगबगही सुरू आहे.
देखाव्यांची तयारी
''ख्रिसमस''निमित्त घरांसह कपेल, क्रॉस (खुरीस) यांची रंगरंगोटी सुरू झाली आहे. ख्रिस्तीबांधवांनी सध्या गोठा आदी सजावटीच्या कामाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
नाताळाच्या पूर्वरात्री शहरातील अवरलेडी ऑफ ग्रेस सायबिणीच्या चर्चमध्ये प्रार्थनासभा आदी कार्यक्रम होणार आहेत. येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारीत भव्य देखावे उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील आठवड्यात शहरात ख्रिसमसचा उत्साही माहोल तयार होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.