

डिचोली: विविध बाजारपेठांमध्ये भाव खाणारा यंदाच्या मोसमातील ‘मानकुराद’ आंब्याचे दर आता काही प्रमाणात आवाक्यात आले असून आंबा काहीसा गोड झाला आहे. डिचोलीच्या बाजारात आता स्थानिक ‘मानकुराद’ची आवकही वाढू लागली आहे.
सध्या बाजारात मानकुरादसह अन्य आंब्यांचा घमघमाट सुटला आहे. हापूस आणि अन्य जातींचे आंबे बाजारात विक्रीसाठी येत असून ‘मानकुराद’ अजूनही भाव खाणारा असला, तरी मागील काही दिवसांच्या तुलनेत तो आता काहीसा स्वस्त झाला आहे. मानकुरादचे दर आवाक्यात असल्याने सध्या डिचोलीत ‘मानकुराद’ गोड झाला आहे.
‘मानकुराद’ची आवक वाढली
डिचोलीच्या बाजारात सध्या मये, नार्वे आदी स्थानिक बागायतींत पिकणारा ‘मानकुराद’ विक्रीस उपलब्ध होत आहे. पुढील सात-आठ दिवसांत ‘मानकुराद’ची आवक आणखी वाढणार असून तो आणखी स्वस्त होईल, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
‘मानकुराद’ काहीसा स्वस्त झाल्याने खवय्यांचा सध्या त्याच्या खरेदीकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. लईराई देवीचे व्रत पाळणाऱ्या धोंड भक्तगणांकडूनही ‘मानकुराद’ला विशेष पसंती दिली जात आहे.
पंधरा दिवसांपूर्वी ‘मानकुराद’चा भाव वाढलेला होता. कमी आवक असल्याने त्याचे दर दीड हजार रुपये डझनपर्यंत पोहोचले होते. आता डिचोलीच्या बाजारात चांगल्या प्रतीचा ‘मानकुराद’ १ हजार ते १२०० रुपये डझन या दराने विकला जात आहे. हापूस आंब्याचे दर सध्या ५०० रुपये डझन आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.