

डिचोली: अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळी सणाचा उत्साह डिचोलीत शिगेला पोहोचला आहे. शहरासह ग्रामीण भागातही सर्वत्र दिवाळीमय वातावरण निर्माण झाले असून, बालगोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सणाच्या आनंदात सहभागी झाले आहेत.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. फराळाचे साहित्य, मिठाई, कपडे तसेच घरगुती वापरातील वस्तूंच्या खरेदीला वेग आला होता. महागाईची पर्वा न करता नागरिक उत्साहाने खरेदी करताना दिसत होते.
दिवाळीनिमित्त शहरातील घरोघरी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी घरांची शोभा वाढवली आहे. एकमेकांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याची लगबगही सुरू होती. तुळशी विवाहापर्यंत सुरू राहणाऱ्या ‘व्हडल्या’ दिवाळीचीही सर्वांना प्रतीक्षा आहे.
दिवाळीच्या पूर्वरात्री डिचोलीत नरकासुर प्रतिमांचे दहन करण्यात आले. अनिष्ट प्रवृत्तीवर विजयाचे प्रतीक असलेल्या या परंपरेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध गल्ल्यांमध्ये आणि वाड्यांवर लहान-मोठ्या नरकासुर प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. काही मंडळांनी तयार केलेल्या भव्य आणि अक्राळविक्राळ प्रतिमा नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होत्या. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
डिचोलीसह सर्वण आदी भागांत नरकासुर वध स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पावसामुळे उत्साहावर विरजण पडले होते. यंदा मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना नरकासुर दहन आणि दिवाळीचा आनंद मनमुराद लुटता आला. त्यामुळे यंदाच्या दिवाळी उत्सवात अधिकच उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.