
डिचोली: स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या डिचोली शहराला लागलेले कचऱ्याचे ग्रहण काही सुटता सुटत नाही. आता तर रात्रीच्यावेळी काळोखाचा फायदा घेवून भर बाजारात कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. तेथे दुर्गंधी निर्माण होत आहे. रोज सकाळी बाजारात फेरफटका मारल्यास कुठे ना कुठेतरी कचरा साचल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे जनावरांचा उपद्रवही वाढला आहे.
काळोखाचा फायदा घेवून बाजारातील विक्रेत्यांकडून हा कचरा टाकण्यात येत असावा असा संशय आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात स्वच्छता केलेल्या मासळी मार्केटजवळील जागेत पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्यावेळी हा कचरा टाकण्यात येत असावा असा संशय डिचोली पालिकेच्या स्वच्छता विभागातील पर्यवेक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पालिकेचे स्वच्छता कामगार रोज सकाळी बाजारातील कचरा काढून साफसफाई करतात. अपवादात्मक प्रकार सोडल्यास सायंकाळपर्यंत बाजार परिसर चकाचक असल्याचे दिसून येते. मात्र, रात्र झाली की बाजारातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल परिसर, मासळी मार्केटजवळ आदी काही ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात या कचऱ्याचे दर्शन घडते.
पालिकेतर्फे बाजारात कचरापेट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तरीदेखील कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. कचरा काढेपर्यंत बऱ्याचदा कचऱ्यावर गुरे तुटून पडल्याचे चित्र पाहावयास मिळते.
बाजारातील व्यापाऱ्यांकडून हा कचरा टाकण्यात येत असावा असा संशय आहे. या कचऱ्यामुळे मात्र पालिकेच्या स्वच्छता कामगारांना सकाळी-सकाळीच धावपळ करावी लागते. व्यापाऱ्यांनी कचरा उघड्यावर टाकू नये, कचरा पेट्यांमध्ये तो टाकावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.