
डिचोली: डिचोलीतील बसस्थानकाचे काम पूर्ण कधी होणार, त्याची प्रतीक्षा लागून राहिलेल्या जनतेसाठी खुषखबर. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून रेंगाळत पडलेला नियोजित बसस्थानक प्रकल्प आता चालू वर्षीच्या अखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याचा आशावाद वाढला आहे. खुद्द आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी तसे स्पष्ट संकेतही दिले आहेत.
शहरातील महत्वाचे असलेल्या बसस्थानकाची लवकर स्वप्नपूर्ती होण्यासाठी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे प्रयत्न जारी आहेत. चालू विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेवेळी आमदार डॉ. शेट्ये यांनी बसस्थानकाच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला होता. सध्याच्या कामाबाबत खंत व्यक्त करुन, बसस्थानकाचे काम पूर्ण तरी कधी होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.
गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे जवळपास १६.५ कोटी रुपये खर्च करुन शहरात अत्याधुनिक बसस्थानक प्रकल्प उभारण्यात येत आहे. एप्रिल २०२२ मध्ये डिचोलीतील नियोजित बसस्थानकाच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. मात्र सुरवातीस पावसाळ्यात जमिनीतून पाणी झिरपू लागल्याने प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण झाला. मध्यंतरी अन्य तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्याने बसस्थानकाच्या कामाची गती मंदावली. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लांबणीवर पडत गेले.
नियोजित बसस्थानक प्रकल्पात आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. बसस्थानक प्रकल्प इमारतीच्या तळमजल्यावर दुकानांसाठी जागा, तर पहिल्या मजल्यावर आरटीओ (वाहतूक अधिकारी) कार्यालय आणि दुसऱ्या मजल्यावर कदंबच्या चालक वाहकांसाठी आराम खोली आणि सभागृह आदी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. अन्य सुविधांसह प्रवाशांसाठी ''आराम कक्ष''ही उपलब्ध करण्यात येणार आहे. या बसस्थानकावर वाचनालयही सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.
आमदारांकडून नाराजी
गेल्या एप्रिल महिन्यात साधनसुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरीश अडकोणकर आणि अन्य अधिकाऱ्यांसमवेत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी बसस्थानक प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली होती.
कामाची कासवगती पाहून आमदार बरेच नाराज झाले होते. बसस्थानकाचे काम वेळेत पूर्ण करणे शक्य नसल्यास काम सोडून द्या. असा समजवजा इशारा त्यांनी संबंधीत कंत्राटदाराला दिला होता, सहा महिन्यात कामाची प्रगती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असा सूचक इशाराही आमदारांनी त्यावेळी कंत्राटदाराला दिला होता. काम रखडल्यास कंत्राटदार बदलण्याचा निर्णय घेण्यात येईल. असेही त्यावेळी आमदारांनी स्पष्ट केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.