
डिचोली: आज डिजिटल आदी विविध मार्गाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यातही काही घटनांवरून अजूनही ‘प्रामाणिकपणा’ काय? त्याचे प्रत्यंतर अधूनमधून येत असते. साखळी येथील एका महिलेलाही असाच ‘प्रामाणिकपणाचा’ अनुभव आला आहे. हरवलेले जवळपास दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आठ तासांच्या आत या महिलेला परत मिळाले आहे.
यासंबंधीची माहिती अशी की, देसाईनगर-साखळी येथील प्रतिभा नाईक देसाई या काल (गुरुवारी) दुपारी बाजारातून घरी जात असताना वाटेत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हरवले होते. घरी पोहोचल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रतिभा यांना धक्का बसला. रस्त्यावर हरवलेले हे मंगळसूत्र बाजारातील सोनार प्रदीप पावसकर यांना मिळाले होते.
स्वतः सोनार असल्याने रस्त्यावर मिळालेले मंगळसूत्र सोन्याचे असल्याची पारख करायला प्रदीप पावसकर यांना वेळ लागला नाही. त्यांनी त्वरित मंगळसूत्र मिळाल्याबद्दलची माहिती व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकली. ही माहिती सर्वत्र व्हायरल झाली.
दुसऱ्या बाजूने मंगळसूत्र हरवल्याच्या विचारात असतानाच, मंगळसूत्र बाजारातील सोनार प्रदीप पावसकर यांना मिळाल्याचे सायंकाळी प्रतिभा यांना समजले. लागलीच प्रतिभा यांनी पावसकर यांच्याकडे संपर्क साधला. मोबाईलवरील फोटोची शहानिशा केल्यानंतर मंगळसूत्र प्रतिभा नाईक देसाई यांचेच असल्याची पक्की खात्री पटली. त्यानंतर साखळीचे उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांना बोलावून त्यांच्याच हस्ते हे मंगळसूत्र प्रतिभा यांना देण्यात आले.
२० ग्रॅमचे मंगळसूत्र
हरवलेले मंगळसूत्र परत मिळाल्याने प्रतिभा नाईक देसाई यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्यांनी सोनार प्रदीप पावसकर यांना धन्यवाद दिले. हे मंगळसूत्र २० ग्रॅम अर्थातच २ तोळ्यांचे होते, अशी माहिती सोनार पावसकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.