डिचोली, मुसळधार पावसाचा डिचोलीतील व्हावटी भागाला मोठा फटका बसला असून, कुळागारांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे.
पावसाच्या तडाख्यात बागायतींचेही नुकसान झाले आहे. दुसऱ्या बाजूने स्थानिक पंचायतीला कळवूनसुद्धा पंचायत किंवा अन्य प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानीची पाहणी करण्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले, अशी व्यथा व्हावटीमधील बागायतदारांनी मांडली.
मागील दोन दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसावेळी वाठादेव नदीने धोक्याची पातळी पार केली होती. नदीकाठच्या कुळागारांनी नदीचे पाणी घुसले. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कुळागारांमधील कवाथे, पोफळी, केळी आडव्या होऊन मातीमोल झाल्या.
व्हावटीमधील बहुतांश कुटुंबांचे बागायती पीक हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र पावसाच्या तडाख्यात कुळागारांची नासधूस झाल्याने खर्च आणि मेहनत वाया गेली आहे.
त्यामुळे बागायतदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे ते पुरते हतबल झाले आहेत. मोठा पाऊस पडला की कुळागारांना तडाखा बसतो, अशी व्यथा रत्नाकर गोवेकर आणि अन्य बागायतदारांनी व्यक्त केली.
पावसाचा तडाखा बसून कुळागरांचे नुकसान झाल्यानंतर पीडित बागायतदारांनी स्थानिक पंचायतीशी संपर्क साधला. मात्र आज शनिवारपर्यंत पंचायत, तलाठी किंवा संबंधित प्रशासकीय पातळीवरील एकाही अधिकाऱ्याने पाहणी केलेली नाही.
आम्ही आता कोणाकडे आशेने बघावे? बागायतदारांना मदत देणे शक्य नसेल तर निदान नदीकाठी संरक्षक कठडा बांधून द्यावा, जेणेकरून कुळागरांना सुरक्षा मिळेल.
- रत्नाकर गोवेकर, बागायतदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.