Bhutani Project Sancoale Permissions
कुठ्ठाळी: सांकवाळ पंचायतीने नेमलेल्या कायदेशीर सल्लागारांपैकी ॲड.झेलर डिसोझा यांनी पंचायतीने न्यायालयात निर्णय होईपर्यंत भूतानी प्रकल्पाबाबत ढवळाढवळ न करता तूर्त बाजूला ठेवावा,असा सल्ला दिला आहे.
या प्रकरणी आज झालेल्या बैठकीत पंच तुळशीदास नाईक आणि मावरेलिओ कार्व्हालो यांनी या सल्ल्यानुसार परवाना स्थगित ठेवण्याची मागणी केली; पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून सत्तारूढ गटाचे सर्व सदस्य एकामागोमाग एक उठून निघून गेले.
भूतानी प्रकल्पाविरोधात सांकवाळ ग्रामपंचायतीने बोलाविलेल्या विशेष ग्रामसभेवेळी विरोधी गटातील तीन पंचांनी या प्रकल्पास विरोध असल्याचे सांगून सचिव ओरविल वालीस यांना तसे इतिवृत्त लिहिण्यास भाग पाडले.
सांकवाळ येथे हा प्रकल्प ४२१७.५० मीटर चौरस क्षेत्रफळात उभारण्यात येणार आहे.
येथे ३० व्हिला आणि ६५५ फ्लॅट मिळून ६८५ बांधकामे उभी राहणार आहेत.
येथील स्विमिंग पुलासाठी ५० लाख ६१ हजार लिटर पाणी लागणार आहे.
याशिवाय पिण्याच्या पाण्याची सोयही आवश्यक आहे.
येथे १० मीटर रुंद रस्त्याची गरज आहे. प्रत्यक्षात येथील रस्ता अरुंद म्हणजे, केवळ ३.८ मीटर एवढाच आहे.
भूतानी इन्फ्रा परमेश कन्स्ट्रक्शन या वादग्रस्त प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी सांकवाळ ग्रामपंचायतीची आज सकाळी ११ वाजता विशेष बैठक आयोजित केली होती; पण कोणत्याही निर्णयाविना ही बैठक सोडून सत्तारूढ गटाचे सदस्य उठून निघून गेल्याने विरोधी सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
टीसीपी समितीने आपली निरीक्षणे नोंदवून आक्षेप घेतले आहेत. तसेच आवश्यक ते परवाने मिळाले नसल्याचे खुद्द ‘भूतानी’ने लिखित स्वरूपात पंचायतीला कळविले आहे. या गोष्टींवर विश्वास ठेवून सांकवाळ पंचायतीने हा दिलेला बांधकाम परवाना रद्द करावा, अशी मागणी विरोधी पंच तुळशीदास नाईक आणि मावरेलीओ कार्व्हालो यांनी केली.
या ग्रामसभेला सांकवाळचे ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभास्थळी पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांसह मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.