
हरमल: हरमल पंचायत क्षेत्रातील बहुचर्चित भटवाडी रस्त्याची दुर्दशा झाली असून ग्रामस्थांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. गटार व्यवस्थेचा अभाव आहे. वाहनचालक आणि स्थानिक लोकांना दररोज मन:स्ताप सहन करावा लागतोय. या रस्त्याने आंतरराष्ट्रीय पर्यटक व अधिकारी नियमितपणे ये-जा करत असतात. तरीही रस्त्याची अवस्था एखाद्या दुर्गम गावातील अंतर्गत रस्त्यासारखी वाटते. या जागतिक पर्यटनस्थळाची दुर्दशा झालेली आहे.
वाहनचालक अतुल नाईक यांनी सांगितले की, पावसाळ्यात या रस्त्याला अक्षरशः ओहोळाचे स्वरूप प्राप्त होते. रस्त्यालगत राहणाऱ्या कुटुंबांना तेथे साचलेल्या पाण्याचा फटका बसला, तर अनेक दुचाकीस्वार घसरून पडून जखमी झाले. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक आणि गटविकास अधिकाऱ्यांनी त्यावेळी पाहणी करून पोलिस संरक्षणात बंद गटार व पाणी वाहून जाण्याचे मार्ग मोकळे केले होते, अशी माहिती ग्रामस्थ रघुनाथ हरमलकर यांनी दिली.
हरमल-पेडणे मुख्य रस्ता देखील अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्याची (Road) एक बाजू पूर्ण खचली आहे. त्यामुळे अनेकजण पेडणे स्थानक किंवा मोपा विमानतळ गाठण्यासाठी मांद्रेचा मार्ग पसंत करत आहेत. गेल्या दोन वर्षांत रस्ते खड्डेमय बनले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे, अशी प्रतिक्रिया एका माजी सरपंचांनी व्यक्त केली.
सध्या कच्च्या दगड–मातीने उंची वाढवलेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. बाजारपेठेतील व्यावसायिक व महिला रोज धुळीने हैराण बनल्या आहेत. अनेकजण श्वसनाच्या त्रासाने त्रस्त झाले असून, ‘धूळ खाणे हेच आमच्या नशिबी लिहिले आहे’, अशी प्रतिक्रिया महिलांनी (Womens) दिली.
श्री कलावती मंदिर परिसर उंचीवर असल्याने सखल भागात पाणी साचते. ग्रामस्थांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटार व्यवस्था करून ती जवळच्या ओहोळाला जोडावी अशी मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते गावस यांनी जून-जुलैमध्ये पाहणी केली होती, मात्र प्रत्यक्षात अद्याप काम झालेले नाही, अशी तक्रार आत्मा नाईक यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.