मोरजी: भाटिर तुये येथे शापोरा नदी पात्रातील बेट पर्यावरण पुरक पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे,यासाठी तुये येथील सुरज चित्कर आणि जनक हळर्णकर या युवक अभियंते प्रयत्नशील असून या बेटाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा,अशी त्यांची अपेक्षा आहे. गोव्याचे पर्यटन केवळ समुद्रकिनाऱ्यांवर अवलंबून राहू नये, अंतर्गत भागातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करता येईल,असा दावा या अभियंत्यांचा आहे.
या बेटावर शेकडो नारळाची झाडे असून या झाडांच्या सावलीत पर्यावरणस्नेही पर्यटनाला वाव मिळावा,यासाठी सूरज चित्कर आणि जनक हळर्णकर यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वतःसाठी सरकारी नोकरी मिळवण्यापेक्षा इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला तर, आपल्या जीवनाचे सार्थक होईल, या हेतूने हे दोन्ही युवक झपाटलेले आहेत. नवनवीन उपक्रम राबवण्याचा या युवकांनी जणू चंगच बांधला आहे.
राज्य सरकारने गोव्याला 365 दिवस पर्यटकांसाठी नंदनवन करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी समुद्र किनाऱ्यांव्यतिरिक्त अंतर्गत भागातील पर्यटनाला वाव देण्यच्या उद्देशाने सरकारने अनेक योजनाही राबविल्या आहेत. या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी चित्कर व हळर्णकर यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.तुये येथील बेटाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी त्यांनी स्वतः गुंतवणूक करून सध्या बेटावर सजावट केली असून पर्यटकांसाठीच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यांत्रिक बोटीचीही सोय केलेली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.