

मडगाव: बेतुल सनसेट पॉईंटवर कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई अनुप कावरेकर व साईराज नाईक यांना मारहाण केल्याप्रकरणी संशयित जेबियार डुंगडुंग (२१) व राहुल किसन (२३) या दोघांना दक्षिण गोवा अतरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
या मारहाण प्रकरणी यापूर्वी न्यायालयाने संदीप तिर्की (३०) व समीर तिर्की (२१) या दोघांना जामीन मंजूर केला होता. १६ ऑगस्ट २०२५ रोजी बेतुल येथील सनसेट पॉईंटवर मारहाणीची वरील घटना घडली होती.
बेतुल येथील ओएनजीसीतील दोन कर्मचारी बेपत्ता असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या शोधासाठी कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस अनुप कावरेकर व साईराज नाईक हे गेले होते. ते सनसेट पॉईंटवर पोहोचले असता संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले होते.
मात्र, ते त्यानंतरही न जाता त्यांनी पोलिस कॉन्स्टेबलांवर दगडफेक केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात अनुप कावरेकर याच्या डोक्यासह शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्या होत्या. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी मागाहून संशयित जेबियार डुंगडुंग, सुरेश हरिया, राहुल किसन, अमित लोहरा यांच्यासह संदीप तिरके व समीर तिरके या सहाजणांविरोधात गुन्हा नोंद करत अटक केली होती.
५० हजारांचा वैयक्तिक बाँड, तेवढ्याच किमतीचा एक स्थानिक हमीदार सादर करणे, तपासात सहकार्य करणे, पुरावे नष्ट न करणे, कुंकळळी पोलिसात पाच दिवस सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत हजेरी लावणे, न्यायालयातील सुनावणीला हजर राहणे, न्यायालयाच्या परवानगीविना राज्याबाहेर जाऊ नये अशा अटीवर दोन्ही संशयितांना दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी या संशयितांना हा जामीन मंजूर केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.