Goa Murder Case: ज्या तीन संशयितांच्या मदतीने सीमांचल परिदा याने बेतालभाटी येथील डॉ. निर्वाण भारत यांचा खून केला, त्या तिघांनाही गोव्यात काम मिळवून देतो, असे सांगून परिदा यानेच गोव्यात बोलावून घेतले होते, अशी नवी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सीमांचल परिदा याच्यासह शाहीद शेख, आलोक सिंग आणि नागेंद्र कुमार यांना अटक केली आहे. त्यांना मडगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांच्या पोलिस कोठडीचा रिमांड देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमांचल हा डॉ. भारत ज्या क्लिनिकमध्ये काम करत होते, तिथेच काम करायचा. काही महिन्यांपूर्वीच त्याने डॉक्टरांच्या घरीही स्वयंपाकी म्हणून काम स्वीकारले होते. तो इतर संशयितांना ओळखत होता.
त्याने त्यांच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. ते परत करण्याचा तगादा त्यांनी लावल्याने तुम्हाला गोव्यात नोकरी मिळवून देतो, असे सांगून त्यांना गोव्यात बोलावून घेतले होते. स्वयंपाकी म्हणून काम करताना परिदा याची डॉक्टरांच्या पैशांवर नजर होती. ते मिळवण्यासाठीच त्याने हे कृत्य केले.
मद्याच्या धुंदीत केले अमानुष कृत्य
ज्या दिवशी डॉक्टरांचा खून करण्यात आला, त्या दिवशी सायंकाळी ते चौघे डॉ. भारत घरात येण्यापूर्वीच तिथे येऊन थांबले होते. तिथे त्यांनी दारू घेतली आणि डॉ. भारत येण्याची वाट पाहात थांबले. डॉक्टर घरी येण्यापूर्वी दारू त्यांच्या अंगात भिनली होती.
डॉक्टर घरी आल्यावर ते बेडरूममध्ये गेले असता, चारही जणांनी त्यांच्यावर झडप घातली. एकजण त्यांच्या उरावर बसला. इतरांनी त्यांचे हात-पाय बांधून घातले आणि नंतर त्यांचा गळा आवळून खून केला.
डॉक्टरांचा मोबाईल नेला आणि फसले
खून केल्यावर ते डॉक्टरांच्याच गाडीतून पसार झाले. परिदाने डॉ. भारत यांचे एटीएम कार्ड घेतले होते. त्याची पिन त्याला माहीत होती. हे कार्ड वापरून त्यांनी एटीएममधून पैसे काढले. ते घेऊन त्यांनी राजस्थानच्या दिशेने पळ काढला.
त्यावेळी त्यांच्याकडे डॉ. भारत यांचा मोबाईल फोनही होता आणि त्याचे लोकेशन ऑन होते. त्यावरून गोवा पोलिसांनी त्यांचा मागोवा घेतला व राजस्थान पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.