Benaulim ZP By-Election: ...तर 'आप'ला संधी! बाणावलीत पोटनिवडणुकीत चुरस

Benaulim ZP By-Election: काँग्रेसचे तिघे अपक्ष म्‍हणून रिंगणात, मनधरणी सुरू; आघाडीचा धर्म पाळण्‍यासाठी प्रयत्‍न
Benaulim ZP By-Election
Benaulim ZP By-ElectionDainik Gomantak

Benaulim News :

सासष्टी, बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी २३ जून रोजी मतदान होत आहे. आम आदमी पक्षाचे आमदार व्‍हेंझी व्हिएगस यांनी जोसेफ पिमेंता यांना उमेदवार म्हणून जाहीर केल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

त्‍यामुळेच इतर तीन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. साहजिकच या निवडणुकीतील चुरस शिगेला पोहोचली आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीअंतर्गत काँग्रेस, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड हे सर्व पक्ष एकत्र आल्याने बाणावली मतदारसंघात उमेदवाराला १६,६८७ मते पडून १४१८१ मतांची आघाडी मिळाली होती.

मात्र आगामी जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीतील चित्र वेगळे आहे. येथे खरी लढत ‘आप’ उमेदवार जोसेफ पिमेंता, काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्‍या रॉयला फर्नांडिस, बाणावलीकारांचा उमेदवार म्हणून अपक्ष अर्ज भरलेले ग्रेयफन फर्नांडिस यांच्यात आहे. चौथा अपक्ष उमेदवार आहे फ्रॅंक फर्नांडिस. या फाटाफुटीमुळे नेमका कोणता उमेदवार निवडून येईल हे सांगता

येणे कठीण बनले आहे. सर्वच उमेदवारांनी दारोदारी प्रचारावर भर दिला आहे.

बाणावली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जी १६,६८७ मते ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवाराला मिळाली, त्यात या मतांचा समावेश निश्‍चितच आहे. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’चे व्‍हेंझी व्हिएगस यांना ६४११ तर त्यांचे प्रतिस्पर्धी तृणमूल काँग्रेस पक्षाचे उमेदवार चर्चिल आलेमाव यांना ५१४० मते मिळाली होती. शिवाय काँग्रेसचे अँथनी डायस यांनी ४६९७ तर ‘आरजी’च्‍या उमेदवाराला ३८५४ मते पडली होती.

Benaulim ZP By-Election
G 20 मध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी दिली जातीय 'ही' खास डिश , तुम्हीही नोट करा रेसिपी

मला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. लोकांनाही ‘इंडिया’ आघाडीच जिंकलेली हवी आहे. आमदार व्‍हेंझी व्हिएगस यांनी नेबाणावलीत चांगला विकास केला आहे, त्याचा फायदा मला मिळेल.

- जोसेफ पिमेंता, उमेदवार (आप)

बाणावलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाने जिल्हा पंचायत पोटनिवडणूक लढवावी असे वाटणे साहजिक आहे. मात्र ‘इंडिया’ आघाडीचा विचार करून रॉयला फर्नांडिस यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.

- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

आता माघार घेण्‍याचा प्रश्‍‍नच नाही. कारण जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार हवा उभा केला पाहिजे होता. ‘आप’ने आपला उमेदवार उभा करून ‘इंडिया’ आघाडीच्‍या एकीला छेद देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

- रॉयला फर्नांडिस, अपक्ष उमेदवार

लोकसभा निवडणुकीत जशी सर्वांनी एकजूट दाखवली होती, तशीच एकजूट आताही दाखविणे गरजेचे आहे. आम्ही सकारात्मक पद्धतीने प्रचार करत असून कोणत्‍याही विरोधी उमेदवारावर टीका करणार नाही.

- व्‍हेंझी व्हिएगस,

आमदार (आप)

वार्का, कार्मोणा, ओर्ली, केळशी येथे मला चांगला पाठिंबा मिळत आहे. शिवाय सरपंच शावियर फर्नांडिस यांच्‍यासह पंचायत मंडळाचीही साथ आहे. चर्चिल आलेमाव यांचे सुपुत्र सावियो हेसुद्धा माझ्‍यासोबत आहेत.

- ग्रेयफन फर्नांडिस,

अपक्ष उमेदवार

...तर आम आदमी पक्षाची झाली असती पंचाईत

चर्चिल, अँथनी व ‘आरजी’च्या उमेदवाराला मिळून पडलेली १३,६९१ मते ही काँग्रेसची मानली जात आहेत.

त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्‍या १६,६८७ मतांपैकी व्‍हेंझी यांना विधानसभेवेळी मिळालेली ६४११ मते वजा केली तर बाकीची १०,२७६ मते काँग्रेसची असेही मानले जाते. त्यामुळे जर रॉयला, ग्रेयफन व फ्रॅंक यांच्यापैकी एकच उमेदवार रिंगणात उतरला असता तर ‘आप’च्‍या उमेदवाराची पंचाईत झाली असती. साहजिकच मते विभागली जाऊन ‘आप’च्‍या उमेदवाराला जिंकण्याची जास्त संधी असल्याचे बोलले जातेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com