'गोवा मे सबकुछ चलता है' मानसिकता बदलायला हवी! किनाऱ्यांवर दलालांचा सुळसुळाट त्रासदायक

Goa Crime: सावज हेरणे, ड्रग्‍सचे आमिष, पर्यटकांच्‍या वाढत्‍या संख्येमुळे अनैतिक गोष्टी देखील वाढत चालल्या आहेत
Goa Crime: सावज हेरणे, ड्रग्‍सचे आमिष, पर्यटकांच्‍या वाढत्‍या संख्येमुळे अनैतिक गोष्टी देखील वाढत चालल्या आहेत
Night ClubCanva
Published on
Updated on

म्हापसा: हर्ष दिनेश तन्वर (२५) या युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत बागा समुद्रकिनाऱ्यावर आढळला होता. त्याच्या शरीरावर सुरीचे अनेक घाव होते. या प्रकरणी पोलिसांनी काल सोमवारी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन त्‍यांना रितसर अटक केली. हे संशयित व्यसनाधीन असून, मिळेल ती कामे करायचे. शिवाय अनधिकृत टाऊट्स (दलाल) म्हणून ते किनाऱ्यावर वावरायचे, असे पोलिस चौकशीतून समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. या खूनप्रकरणामुळे कळंगुटमधील बेकायदा टाऊट्सचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कळंगुट पोलिसांनी साहिल भटनागर (२८, रा. कळंगुट व मूळ उत्तराखंड), सुनील विश्‍‍वकर्मा (२२, रा. कळंगुट व मूळ नेपाळ) व नूर मोहम्मद (२७, रा. पर्रा व मूळ उत्तर प्रदेश) या तिघांना अटक केली आहे. ते बारीक-सारीक चोऱ्या व वाटमाऱ्या करायचे. तसेच किनाऱ्यांवर ड्रग्सची देवाणघेवाण करून आडमार्गाने पैसे मिळवायचे, असे सूत्रांनी सांगितले.

शनिवारी १० ऑगस्‍ट रोजी सकाळी आठच्या सुमारास हर्ष हा बागा किनाऱ्यावर संशयास्पद स्थितीत निपचित अवस्थेत आढळला होता. त्याच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. त्यामुळे हे खूनप्रकरण असू शकते, असा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी त्याचवेळी बांधला होता. त्यानुसार तपासाला गती देत, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या तिघांचा मागावा काढला होता.

काल सोमवारी (ता. १२) सकाळी मृत हर्षच्या अंगावरील जखमा या सुरीने घाव केल्‍यामुळेअसल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. मयत हा किनाऱ्यावर एकटा असल्याचे पाहून या तिघा संशयितांनी पैशांच्या हव्यासापोटीच त्याचा निर्घृणपणे सुऱ्याचे घाव घालून खून केला आणि त्‍याच्‍या खिशातील १० हजार रुपये चोरून घटनास्थळावरून पळ काढला होता.

कळंगुट समुद्रकिनारा हा जगप्रसिद्ध आहे. दरदिवशी हजारो पर्यटकांची तेथे रेलचेल असते. अशातच, पर्यटकांच्‍या वाढत्‍या संख्येमुळे अनैतिक गोष्टी देखील वाढत चालल्या आहेत. उघडपणे अनधिकृत बॉडी मसाज, वेश्‍‍याव्‍यवसाय तसेच अमलीपदार्थांची आमिषे पर्यटकांना दाखविली जातात. अनेकजण या लोभापायी आपल्याकडील पैसे गमावून बसतात. अनेकदा पर्यटकांना ओलीस धरून त्यांच्याकडील पैसे उकळण्याचे प्रकार घडले आहेत.

सूत्रांच्या माहितीप्रमाणे, यापैकी बरेच दलाल पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत असल्याचा दावा करतात. परंतु प्रत्यक्षात ते बिगरगोमंतकीय असतात, ज्यांना स्थानिक दलाल व फोटोग्राफरनी सबलेट केलेले असते. मात्र पोलिस किंवा पर्यटन कर्मचारी या गैरप्रकारावर कारवाई करण्याबाबत गंभीर दिसत नाहीत. हे अनधिकृत टाऊट्स अधिकाऱ्यांच्‍या नाकावर टिच्चून या कारवाया करतात. त्याचप्रमाणे, कथित डान्सबार किंवा पबच्या नावाने टाऊट्सवाले पर्यटकांना आमिषे दाखवतात. अनेकजण ‘गोवा मे सबकुछ चलता है’ याच मानसिकतेने पर्यटनासाठी येतात. याचा गैरफायदा घेऊन हे दलाल आडमार्गाने त्‍यांची फसवणूक करतात व त्यांच्याकडून पैसे लुबाडतात. परिणामी गोव्याची प्रतिमा मलीन होत चालली आहे.

संशयित हे बेरोजगार व व्यसनाधीन असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्‍यातील नूर हा शिंपी आहे. संशयितांनी आडमार्गाने झटपट पैसा कमावण्याच्या नादात दिल्लीमधील युवकाचा जीव घेतला. मृत हर्ष हा दोन दिवसांपूर्वीच गोव्यात आला होता. अधूनमधून त्याचे गोव्यात येणे-जाणे होते.

गोव्यात आलेले पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना भेट दिल्‍याशिवाय जात नाहीत. दररोज शेकडो पर्यटकांची किनाऱ्यांवर ये-जा असते. हिच संधी साधून दलालांनी आपले बस्‍थान बसविले आहे. ड्रग्‍स, चोऱ्या, फसवणूक, वेश्‍‍याव्‍यवसाय आदी अनैतिक प्रकारांना ऊत आला आहे. बागा किनाऱ्यावर दिल्लीतील युवकाचा पैशांसाठी झालेला खून हा त्‍यातूनच झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. गांजा म्‍हणून गवत विकल्‍याने वाद झाला आणि नंतर त्‍या युवकावर सपासप वार करण्‍यात आले. त्‍यामुळे या दलालांचा वेळीच बंदोबस्‍त करणे गरजेचे बनले आहे.

‘लडकी चाहिए क्या?’

सदर दलाल बेकायदेशीरपणे किन‍ाऱ्यावर वावरतात व आपले सावज हेरून त्यांना ‘लडकी चाहिए क्या?’ असे विचारतात. तसेच त्‍यांना ड्रग्‍सचेही आमिष दाखवतात. मुळात या टाऊट्सवाल्यांची कुठेही नोंदणी नसते. तसेच या खूनप्रकरणामुळे पुन्हा एकदा भाडेकरू पडताळणीचा प्रश्‍‍न समोर आला आहे. पोलिस अनेकदा टाऊट्सना पकडतात, मात्र नंतर दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देतात. अशा वेळी सरकारने विशेष धोरण राबवून यावर अंकुश आणण्याची गरज आहे, असे लोकांचे मत बनले आहे.

अन्‌ सावज हेरले

तिघाही संशयितांना पैशांची मोठी गरज होती. घटनेच्या दिवशी रात्री उशिरा ते बागा किनाऱ्यावर गेले होते. ड्रग्सची विक्री किंवा वाटमारी करून पैसे उकळण्याच्या हेतूनेच त्‍यांनी आपला मोर्चा किनाऱ्याकडे वळविला होता. तिथे संशयितांची गाठभेट हर्षसोबत झाली. त्यांनी हर्षला आपल्या संवाद कौशल्याने गुंतवून ठेवले. तसेच हर्षच्या बॅगेत पैसे असल्याचे पाहून त्यांनी आपले सावज हेरले.

कळंगुट पंचायत राबवणार विशेष अभियान

कळंगुट किनाऱ्यावरील टाऊट्सचा वावर हा पंचायतींसह पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कळंगुट पंचायतीने नवीन हंगामापासून किनाऱ्यांवरील टाऊट्सना हटविण्याची मोहीम राबविण्याचे योजिले आहे. यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. टाऊट्सचा विषय कळंगुटसाठी नवीन नाही. अनेकदा हा विषय गाजतो. ग्रामसभेतही स्थानिकांनी याविषयी चिंता व्यक्त केली होती आणि याच टाऊट्समुळे एका २५ वर्षीय युवकाला जीव गमवावा लागला.

Goa Crime: सावज हेरणे, ड्रग्‍सचे आमिष, पर्यटकांच्‍या वाढत्‍या संख्येमुळे अनैतिक गोष्टी देखील वाढत चालल्या आहेत
Goa Crime: नावेली दरोडा कट प्रकरणी दोघांना अटक; सात दिवस पोलिस कोठडी

चपलेने काढला माग!

घटनास्थळी पोलिसांना चप्पल सापडली होती. त्यानुसार त्‍यांनी किनाऱ्यावरील आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्या. यात तिघेजण शनिवारी पहाटेला घटनास्थळी जात असल्याचे आढळले. त्यातील दोघांच्या पायात चपला नव्हत्या. त्यानंतर चौकशीअंती पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले.

गांजा म्‍हणून गवत दिल्‍याने झाला वाद

संशयितांनी हर्षसोबत वाद घातला व त्यांच्यात झटापट झाली. संधी साधून संशयित नूर याने हर्षवर सुऱ्याने वार केले. यात रक्तबंबाळ होऊन हर्ष किनाऱ्यावर निपचित पडला. संशयितांनी हर्षला दारू पाजण्याचे आमिष दाखवले. तसेच गांजा म्हणून गवत दिले. याच वादातून झालेल्या झटापटीत हर्षला स्वतःचा जीव गमवावा लागला. एका संशयितालाही सुरा लागला.

Goa Crime: सावज हेरणे, ड्रग्‍सचे आमिष, पर्यटकांच्‍या वाढत्‍या संख्येमुळे अनैतिक गोष्टी देखील वाढत चालल्या आहेत
Goa Crime: वार्का परिसरात पोलिसांची मोठी कारवाई! सार्वजनिक शांतता भंग केल्‍याबद्दल १२ जण ताब्‍यात

सरकारने निर्णायक पाऊल उचलावे; गोवा फॉरवर्ड

राज्‍यातील समुद्रकिनाऱ्यांवर तोतया दलालांची संख्‍या वाढली आहे. त्‍यांच्‍याकडून वारंवार पर्यटकांना लुबाडले जात आहे. नुकतीच ​उत्तर गोव्यात अशा तीन तोतया दलालांनी एका पर्यटकाची निर्घृण हत्या केल्‍याचे उघडकीस आले आहे. या दलालांचा ताबडतोब बंदोबस्‍त करणे गरजेचे आहे, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस आणि प्रवक्‍ते दुर्गादास कामत यांनी केली आहे.

सदर विषय गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभा अधिवेशन तसेच अन्‍य व्‍यासपीठांवरून मागची तीन वर्षे सातत्‍याने उपस्‍थित करून समुद्रकिनाऱ्यांवर दलालांची वाढती संख्‍या व कारवायांबद्दल चिंता व्यक्त केल. पण लक्ष देण्‍यात आले नाही, असे ते म्‍हणाले.

किनाऱ्यांवरील तोतया दलाल ड्रग्‍स तस्करी आणि वेश्याव्यवसायात गुंतलेले आहेत. त्‍यामुळे गोव्याची प्रतिमा मलिन होत आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही तर केवळ किनाऱ्यांवरच नव्हे तर राज्यात सर्वत्र अनैतिक कारवायांमध्‍ये या दलालांचा सुळसुळाट दिसून येईल.

दुर्गादास कामत (सरचिटणीस, गोवा फॉरवर्ड)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com