

पावसाळा कधीचा गेला, पण काहींच्या डोक्यात मात्र अजूनही ‘पावसाळी’ चमक आहे असे दिसते. महिनाभरापूर्वीच पावसात गटार बांधणारे जे दिसले होते, त्याच धर्तीवर आता किनारी भागात एका नामांकित बिल्डरने रस्त्यालगत सरकारी जागा घासून थेट गटार खोदकाम सुरू केले आहे. लोकांनी विचारले तर मी तुमच्यासाठीच बांधत आहे, पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून… असे उत्तर काम करणारे देतात. गंमत म्हणजे, यासाठी त्यांनी पंचायत परवानगी घेतली नाही, कागदपत्रांचा पत्ता नाही… आणि काम मात्र अगदी धडाधड सुरू. त्यामुळेच किनारी भागात “हे गटार रस्त्याचे पाणी नेणार की कोणाचं ‘विशेष’ पाणी?,अशी चर्चा एकू येते. आता या गटारातून काय वाहणार? पावसाचे पाणी की बिल्डरचे डावपेच, यावर सध्या किनारी भागात जोरदार अशी चर्चा रंगली आहे. ∙∙∙
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे सातत्याने पक्षाचाच विचार करत असतात. कार्यक्रम मग कोणताही असो ते कार्यकर्त्यांना साद घातल्याशिवाय राहत नाहीत. शुक्रवारी भाजपचे पदाधिकारी सतीश धोंड यांच्या मुलीचा विवाह सोहळा ताळगाव येथे होता. साहजिकच संघ आणि भाजप परिवारातील अनेकजण तेथे आले. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दामू त्या समारंभात बराच वेळ रेंगाळले होते. प्रत्येकाला भेटून संवाद साधत होते. ∙∙∙
भाजपचे पश्चिम बंगालमधील संघटन सचिव सतीश धोंड यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात शुक्रवारी जिल्हा पंचायत निवडणुकीचीच चर्चा होती. अनेक नेते, कार्यकर्ते भेटल्यावर आपल्या भागात काय चालले आहे, याची माहिती एकमेकांना देत होते. या कौटुंबिक सोहळ्याला राजकीय किनार यामुळे लाभली होती. अनेक मंत्री, आमदार, माजी आमदार, माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री यानिमित्ताने एकत्र आले आणि राजकीय गप्पांचा फड रंगला होता. ∙∙∙
सांगे आणि केपे हे दोन्ही तालुके गणेशचतुर्थीच्या लॉटरीसाठी तसे प्रसिद्ध. या दोन्ही ठिकाणी महागड्या गाड्या बक्षीसरूपात ठेवल्या जातात. हे सर्व आठवण करून देण्याचे कारण म्हणजे सांगे येथे राजकीय बदल घडवून आणणार, असे सांगत वारंवार सोशल मीडियावर आवाज काढणाऱ्या युवा लोकप्रतिनिधी असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने घातलेल्या लॉटऱ्या. असे म्हणतात, त्या कार्यकर्त्याच्या घराजवळ एक बोकड चुकून पोहोचले. त्याचाच फायदा घेत त्याने त्या बोकडाला बांधून घातले आणि लगेच लॉटऱ्या सुरू केल्या. या लॉटरीचे बक्षीस म्हणून हे बोकड ठेवण्यात आले. आता बक्षीस बोकड म्हटल्यावर काहीजणांनी लॉटरी विकत घेतलीही. या लॉटरीचा निकालही म्हणे जाहीर झाला; पण इनाम लागलेला माणूस आपले बक्षीस घेण्यासाठी त्या सामाजिक कार्यकर्त्याकडे पोहोचण्यापूर्वीच त्या बोकडाने स्वतःला दोरीच्या बंधनातून सोडवून घेत पळ काढल्याने त्या व्यक्तीला बक्षीस मिळालेच नाही. आणि ज्या सामाजिक कार्यकर्त्याने ही लॉटरी घातली त्यानेही बोकड पळून गेले, आता मी काय करू, असा पवित्रा घेतल्याने त्या इनाम लागलेल्या व्यक्तीला हात हलवत परत जावे लागले. सध्या या पळालेल्या बोकडाचा किस्सा सांगेत बराच गाजत आहे, बरं का!∙∙∙
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते यापूर्वी पडद्याआडून करीत होते. परंतु आता पक्षातील वरिष्ठ नेतेही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र हा प्रकार निश्चित कोणालाही न पटणारा, असाच वाटतो. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरजी-गोवा फॉरवर्ड पक्षांबरोबर युती करण्याविषयी पक्षाचे आमदार आग्रही राहिले; पण जागावाटपाचा किंवा जागांचा तिढा सोडवण्यात हे नेते अपयशी ठरले. खरेतर युतीसाठी आमदारांनी पुढाकार घेतला होता. प्रदेशाध्यक्षांशी नंतर त्याची चर्चा झाली. त्यामुळे युती ज्या पक्षांशी आहे, त्या पक्षांच्या नेत्यांशी आणि काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलणी-चर्चा घडवून आणण्याचे कामही त्यांनाच करावे लागणार होते; पण तसे काही झाले नाही आणि युतीच्या प्रश्नावर पाटकर प्रसारमाध्यमांच्या कोंडीत सापडले की त्यासाठी व्यूहरचना केली गेली, हे काँग्रेसच्याच नेत्यांना पक्के माहीत आहे. अशा कुरघोड्या करण्यात काँग्रेस नेत्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्यच. ∙∙∙
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशातील विविध राज्यांच्या राजभवनाचे नामकरण आता ‘लोकभवन’ असे करण्यात आले आहे. आपल्या शेजारील केरळ आणि महाराष्ट्र राज्यांनीदेखील राजभवन नाव बदलून ‘लोकभवन’ असे नामकरण केले आहे. एरव्ही सर्व बाबतीत अग्रेसर असणारा गोवा मात्र नाव बदलण्यात मागे पडतोय का? असा विषय चर्चिला जात आहे. माजी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्या कार्यकाळात केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी गोवा राजभवनाचे रूपांतर हे लोकभवनात झाल्याचे विधान केले होते... तसे पाहता गोव्याचे राजभवन हे लोकभवनच आहे; परंतु अजून बारसे झालेले नाही. राज्य सरकारच्या संकेतस्थळावरदेखील अजून ‘राजभवन’ असाच उल्लेख आहे. त्यामुळे नेमके गोव्यात ‘लोकभवन’ होणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ∙∙∙
एकेकाळी आपल्या दुचाकीने सगळा केपे मतदारसंघ पालथा घालून भाजपचे कार्यकर्ते एकत्र ठेवणाऱ्या माजी मंडळ अध्यक्ष संजय वेळीप यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याचे कित्येकांना आश्चर्य वाटले; पण असे म्हणतात त्यापूर्वी झालेले पंचायतीचे राजकारण त्याला मुख्य कारण होते. संजय वेळीप हे बाळ्ळी पंचायतीचे पंचसदस्य असून या पंचायतीत जेव्हा सत्ताबदल झाला तेव्हा संजय यांनी आपल्याला सरपंच करा, असा प्रस्ताव भाजप नेत्यांसमोर ठेवला होता. मात्र, त्यांचा हा प्रस्ताव फेटाळला तर गेलाच त्याशिवाय त्यांनी भाजपच्या विरोधात काहीही हालचाली करू नयेत यासाठी त्यांच्या घरावर पोलिस पहारा ठेवल्यामुळे नाराज झालेल्या संजय यांनी सरळ भाजपला आपल्या पत्नीसह रामराम ठोकला. पंचायतीचे हे राजकारण आता भाजपला जिल्हा पंचायत निवडणुकीत चांगलेच जड जाणार हे नक्की! ∙∙∙
फोंड्यातील पदपथ मोकळे करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्यामुळे त्याचे स्वागतच होत आहे. आतापर्यंतच्या अनेक नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी अशाप्रकारचा प्रयत्न करून पाहिला आहे, पण पाठ फिरली की पुन्हा पदपथावर असा प्रकार सातत्याने दिसला आहे. या विक्रेत्यांना कोण पदपथावर बसवतो, त्यांच्याकडून कोण मलिदा खातो, हे आधी पहायला हवे. आता पदपथ जर स्वच्छ आणि मोकळे करायचे असतील तर त्यात सातत्य असायला हवे. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांत समन्वयही त्यासाठी आवश्यक असून पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जर पदपथ मोकळे करण्याची तयारी ठेवली तरी बस्स झाले. पालिकेकडून फोंडा मार्केटची पाहणी करण्यात येणार आहे, असे समजल्यावर फुटपाथ लगेच मोकळे झाले, त्यांना कुणी आगाऊ सांगितले, माहीत नाही, पण हाच प्रकार कायम राहू दे, अशीच लोकांची मागणी आहे∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.