Basaveshwar Temple Sattari: नगरगाव पंचायत क्षेत्रातील झाडानी सत्तरी येथील प्रसिध्द बसवेश्वर मंदिराच्या १६ पाषाणी मूर्ती गायब होण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यासंबंधीची काही जागृत नागरिकांनी पोलिसांत तक्रार करूनही अजून पोलिस घटनास्थळी दाखल झालेले नाहीत. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार झाडानी येथील बसवेश्वर मंदिरात शिवलिंग व इतर पाषाणी मूर्ती असलेले मंदिर आहे. या देवावर अनेकांची श्रध्दा आहे. दरवर्षी महाशिवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा करतात. हे मंदिर म्हादई अभयारण्य क्षेत्रात येत असून आजूबाजूला लोकवस्ती नाही. मात्र, पर्यटक मोठ्या प्रमाणात मंदिराला भेटी देत असतात. वाळपईतून २० किमी अंतरावर हे मंदिर आहे. सत्तरीसह गोव्यातील हजारो भाविक शिवरात्रोत्सवासाठी मंदिराला भेट देतात. या मंदिरासाठी देवस्थान समितीचीही निवड करण्यात आली आहे. तीच समिती उत्सव साजरे करते. पावसाळ्यात या मंदिराकडे जाणे शक्य होत नाही, कारण म्हादई नदीला पाणी येते व मंदिराकडे जाणे कठिण बनले.
काल सोमवार शेवटचा श्रावणी सोमवार होता. त्यामुळे देवस्थान समितीचे काही भाविक मंदिराला भेट देण्यासाठी गेले असता त्यांना मंदिरात मूर्ती गायब झाल्याचे समजले. एकूण १६ पाषाणी मूर्ती चोरीला गेल्याचे समजते. त्यातील काही मूर्ती तोडून काढल्या आहेत. काल वाळपई पोलिसांत तक्रार दिल्यानंतर वाळपई पोलिस झाडानी येथे भेट देण्यासाठी गेले होते , मात्र नदीला पाणी असल्याने नदी पार करुन जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे सर्वांनी परतीचा मार्ग स्वीकारला.
झाडानी मंदिर हे संस्कृतीचे प्रतीक !
पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले, म्हादईच्या काठी असलेले हे झाडानी गावात १९९८ मध्ये २४ मूर्तींचा शोध आम्हाला लागला होता. त्यातील १६ पाषाणी मूर्ती आणून तिथे मंदिर उभारण्यात आले. गेल्या काही वर्षापासून महाशिवरात्रोत्सवीस ४-५ हजार भाविक जमतात. या पाषाणी मूर्ती आमच्या संस्कृतीचे प्रतीक असून त्या पुरातन होत्या. त्यात शिवलिंग, गजलक्ष्मी, सातेरी, ब्राम्हणी, केळबाय, मष्णो देव व इतर देवतांची प्रतीके होती. गोव्यातील सांस्कृतिक व पुरातन काळाचा इतिहास सांगणाऱ्या या मूर्ती होत्या.
पाषाणी मूर्ती गायब झाल्याची ही घटना धक्कादायक असून पोलिसांनी कसून तपास केला पाहिजे. सत्तरीत यापूर्वी सुध्दा रिवे, नागवे व इतर भागातील पाषाणी मूर्ती गायब करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या १६ मूर्तींचा छडा लवकरात लवकर लावावा.
- राजेंद्र केरकर, पर्यावरण प्रेमी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.