Banastarim Bridge Accident Suspect Meghana Sawardekar driving licence suspended: बाणस्तारी अपघातप्रकरणी मर्सिडीस कारची मालकीण मेघना परेश सावर्डेकर हिचा वाहन परवाना रद्द करण्यात आला आहे.
या कारच्या चालकाने सहावेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही त्याची दंडात्मक रक्कम जमा न केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे तिला कोणतेही वाहन चालवण्यास बंदी असेल.
दुसरीकडे मद्यधुंद अवस्थेत कार चालवून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मेघनाचा पती परेश सावर्डेकर याचाही वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची शिफारस पोलिसांनी केली आहे.
त्यावरील सुनावणी सध्या सुरू असल्याची माहिती वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बाणस्तारी अपघात झाला तेव्हा या कारची माहिती वाहतूक खात्याने शोधली असता मेघनाने वाहतूक नियम मोडल्याचे उघडकीस आले होते.
तिला नोटीस देऊन वाहतूक खात्याने तिचा वाहन चालवण्याचा परवाना मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
मद्यधुंद अवस्थेत असताना मर्सिडीज कार चालवून तिघांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या परेश सावर्डेकर याचा वाहन चालवण्याचा परवाना निलंबित करण्याची शिफारस पोलिसांनी वाहतूक खात्याला केली होती.
अपघातावेळी त्याच्या रक्तामध्ये मर्यादेपेक्षा तीनपटीने मद्याचे अंश असल्याचे चाचणीत आढळून आले होते. त्यामुळे त्याला नोटीस बजावून त्याचा परवाना का रद्द केला जाऊ नये, यावर उत्तर मागितले होते.
यासंदर्भात सुनावणी सहाय्यक वाहतूक संचालकांसमोर सुरू आहे. त्याचा परवाना निलंबित की मागे घ्यायचा यासंदर्भातचा निर्णय सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल, असे या अधिकाऱ्याने माहिती दिली.
आव्हान देण्याचा पर्याय खुला
मेघनाचा वाहनचालक परवाना रद्द केल्याने तिला आता नव्याने परवान्यासाठी अर्ज करावा लागेल, किंवा वाहतूक खात्याच्या वाहन परवाना रद्दच्या निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय आहे. या कारच्या चालकाने अनेकदा वेगमर्यादेचे उल्लंघन केले आहे.
तसेच काहीवेळा वाहतूक सिग्नल तोडले होते. याप्रकरणी वाहतूक खात्याकडे कारनोंदणी असलेल्या पत्त्यावर कार मालकिणीला दंडात्मक कारवाईची नोटीस (चलन्स) पाठवण्यात आली होती. नोटिशीची मुदत उलटून गेली तरी दंडाची रक्कम जमा केली नव्हती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.