

मडगाव: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर १९ रोजी बाळ्ळी चार रस्ता ते केपे या मार्गावरील रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाला अखेर सुरवात करण्यात आली. गेल्या तब्बल १४ वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम आता प्रत्यक्षात सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी दिली.
या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, तसेच स्थानिक जनप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाला नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केपे मतदारसंघातील विकासकामांना गती मिळत असल्याचे नमूद करत आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
त्यांच्या पुढाकारामुळे प्रलंबित कामांना चालना मिळत असून, भविष्यातही विकासाची गती कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार एल्टन डिकॉस्ता म्हणाले की, बाळ्ळी ते केपे हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत होता आणि प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या डांबरीकरणामुळे प्रवास सुलभ होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. उर्वरित कामांसाठीही लवकरच आदेश मिळवून सर्व विकासकामे पूर्ण केली जातील.
या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री दिगंबर कामत यांचे सहकार्य लाभल्याबद्दल डिकॉस्ता यांनी आभार मानले. एकूणच, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारणापलीकडे जाऊन काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक मतदारसंघात चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. नागरिकांना खराब रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.