

वास्को: बायणात दरोडा पडून आठ दिवस उलटल्यावर पोलिसांच्या हाती संशयित लागले. मात्र, या दरोड्यामुळे सुमारे ३३ वर्षांपूर्वी वास्को शहर भागात दिवसाढवळ्या पडलेल्या दरोड्याच्या आठवणी वास्कोवासीयांसाठी ताज्या झाल्या.
या घटनेबाबतची माहिती अशी, की ३१ मे १९९३ रोजी सकाळी ११ वा. मुरगाव तालुका साहाय्यक भागशिक्षणाधिकारी कार्यालयातील कॅशियर यशवंत बांदोडकर, साहाय्यक भागशिक्षणाधिकारी आंद्रांदे, क्लार्क लता आणि इतर दोन शिपाई असे पाचजण स्टेट बँकेतून सुमारे सहा लाख रुपयांची रोकड घेऊन निघाले होते. त्याकाळी शिक्षकांना भागशिक्षणाधिकारी कार्यालयात वेतन वितरित केले जात होते.
बांदोडकर यांच्याकडे रु. चार लाख, तर शिपायाकडे रु.दोन लाख असलेली बॅग होती. ते पाचजण अंतर्गत रस्त्याने रोकड घेऊन कार्यालयाकडे येत असतानाच कोसंबी बिल्डिंगजवळ अचानक सातजणांनी चॉपर, कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला.
मात्र, शिपाई सुटका करून घेऊन बॅगेसह तो कार्यालयाकडे धावला. इकडे दरोडेखोर बांदोडकर यांच्या हातातील बॅग ओढू लागले. एकाने त्यांच्या हातावर चॉपरचा वार केला.
त्यामुळे बांदोडकर यांनी हातातील बॅग आंद्रादेकडे फेकली.आंद्रादेंवर हल्ल्याचा प्रयत्न केला. तेव्हा बांदोडकर यांनी हल्लेखोराला मागे खेचल्याने बांदोडकर यांच्या डोक्यावर चॉपरचा वार केला. त्यामुळे बांदोडकर रक्तबंबाळ झाले. यात दरोडेखोर चार लाखांची रोकड घेऊन व्हॅनमधून पळाले.
तत्कालीन निरीक्षक आपा तेली व उपअधीक्षक मोराईस यांच्यासह उपनिरीक्षक सॅमी तावारिस, उदय नाईक, गजानन प्रभूदेसाई व इतर पोलिस माहिती मिळताच त्या दरोडेखोरांना शोधण्यास निघाले. तेव्हा एकच जीप असल्याने ॲड राजन नाईक यांनी आपल्या फियाटमधून सॅमी तावारिस व इतरांना मांगोरहिल मार्गाने नेले. तर चिखली बाजूने उदय नाईक वगैरे जीपने निघाले.
मांगोरहिल येथे एका सायकलला त्या व्हॅनने धडक दिल्याची माहिती मिळाली. त्या व्हॅनचा अपुरा क्रमांक मिळाला होता. पण पोलिसांनी या धाडसी दरोड्याचा तपास अवध्या दोन तीन तासांत लावल्याने त्यांचे कौतुक झाले होते.
दरोड्यातील व्हॅन पुन्हा वास्कोकडे येत असल्याचे दिसले. तावारिस यांनी ती अडवून चौकशी केली. तेव्हा आपली व्हॅन भाड्याने ठरविली होती, असे सांगून त्यांना कासावलीत सोडल्याचे व्हॅनचालकाने सांगितले. त्यामुळे त्याला घेऊनच सॅमी तावारिस वगैरे पुढे निघाले. कासावलीत दोघे जात असल्याचे दिसले. त्यांना त्या व्हॅनचालकाने ओळखले.
त्यामुळे त्यांना धरण्यासाठी तावारिसनी चालत्या वाहनातून उडी मारली.परंतु तो दरोडोखोर उंच कुंपणावरुन उडी मारून शेतातून धावू लागला. फुटबॉलपटू असलेल्या तावारिस यांनी कुंपणावरून उडी घेत त्याचा पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपले इतर साथीदार कासावलीत असल्याचे सांगितले. त्यानंतर इतर पोलिसांच्या मदतीने त्या इतरांनाही पकडण्यात आले.
दरोड्यातील रु.चार लाखांची बॅग घेऊन मास्टर माईंड व्हिन्सी हा केरळात पळाला होता. व्हिन्सीची प्रेयशी ही कासावलीत राहत होती. त्यामुळे इतर दरोडेखोर तेथे थांबले होते आणि पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यानंतर उदय नाईक यांच्या नेतृत्वाखाली एक पोलिस पथक केरळला गेले.
तेथे तपास करून व्हिन्सी याला अटक करून तीन लाखांची रोकड जप्त केली. एक लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यावेळी दरोडेखोरांना अवघ्या काही तासांत अटक करण्याची धडाडीची कामगिरी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सॅमी तावारिस, तत्कालीन उपनिरीक्षक उदय नाईक, उपनिरीक्षक गजानन प्रभुदेसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. त्या सात दरोडेखोरांना दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षाही झाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.